ढाका - बांगलादेशात मुस्लीम कट्टरतावाद्यांनी हिंदू घरांची जाळपोळ केल्याची घटना रविवारी घडली. मुस्लीम धर्माची फेसबुकवरून निंदा केल्याची अफवा पसरल्यानंतर कट्टरतावाद्यांनी हिंदू घरांवर हल्ला केला. कोमिल्ला जिल्ह्यात ही घटना घडली. तणाव निर्माण झाल्यानंतर परिसरात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी आधी हिंदू घरांतील सामानाची नासधूस केली, त्यानंतर आगी लावल्या.
कशी पसरली अफवा?
फ्रान्समध्ये राहणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाने फेसबुक पोस्ट शेअर केल्यानंतर अफवा पसरली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युल मॅक्रॉन यांनी कट्टर विचारधारेविरोधात केलेल्या उपाययोजनांची या नागरिकाने स्तुती केली. तसेच ही फेसबुक पोस्ट कोमिल्ला जिल्ह्यातील काही नागरिकांनी शेअर केली आणि मॅक्रॉन यांच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केल्याचा आरोप आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरली. हिंदूंनी प्रेषित मोहम्मद यांची निंदा केली तसेच व्यंगचित्राला पाठिंबा दर्शवल्याची अफवा पसरली.
९ घरांना लावल्या आगी
अफवा पसल्यानंतर काही कट्टरतावाद्यांनी हिंदू घरांना आगी लावल्या. यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पोलीस प्रमुख सईद नुरील यांनी सांगितले की, हिंसाचार करणाऱ्यांपैकी ५ जणांना अटक करण्यात आले आहे. व्हिडिओ फुटेजच्या माध्यमातून पुढील कारवाई सुरू आहे. फेसबुक पोस्ट शेअर करणाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.