बीजिंग – भारताबरोबर सीमेलगत कुरापती करणाऱ्या चीनने भारतीय विद्यार्थ्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. हा विद्यार्थी चीनमधील विद्यापीठ शिकत असताना त्याने स्थानिक समाज माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा दावा चीनने केला आहे.
कडुक्कास्सेरी असे या भारतीय विद्यार्थ्याचे नाव आहे. हा विद्यार्थी पूर्व जियाग्सू प्रांतामधील जियाग्सू विद्यापीठात शिकत आहे. सिना वूईबो या ट्विटरसारख्या समाज माध्यमात त्याने केलेली पोस्ट व्हायरल झाल्याचे चीनच्या सरकारी मुखपत्राने म्हटले आहे.
नियमानुसार चुकीचे कृत्य करणाऱ्या विदेशातील विद्यार्थ्यावर कारवाई करणार असल्याचे जेएसयू विद्यापीठातील वू या अधिकाऱ्याने सांगितले. विद्यार्थ्याची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे. विद्यार्थ्याने माफी मागितल्याचा दावाही चिनी माध्यमांनी केला आहे.
चीनमध्ये खासगी माध्यमांना व अमेरिकनसह इतर कुठल्याही देशाच्या समाज माध्यमांना परवानगी नाही. पूर्व लडाखमध्ये भारत-चीनचे सैन्य आमनेसामने उभे ठाकले आहेे. चीन व भारताच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती. त्या घटनेत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले आहे. तर चीनच्या सुमारे 43 सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येेते.