वॉशिंग्टन : येत्या नोव्हेंबर अखेर पर्यंत अफगाणिस्तानमध्ये असणाऱ्या अमेरिकी लष्करातील सैनिकांची संख्या पाच हजारांपेक्षा कमी करण्यात येणार असल्याची माहिती देशाचे संरक्षण सचिव मार्क एस्पर यांनी दिली. शनिवारी झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे स्पष्ट केले.
यापूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही एका मुलाखतीमध्ये लष्कर कमी करण्याच्या योजनेबाबत संकेत दिले होते. नोव्हेंबरच्या सुरूवातीला होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन लष्कराचे किती ट्रूप्स असतील, असे विचारले असता ट्रम्प यांनी "चार ते पाच हजार" असे उत्तर दिले होते.
फेब्रुवारीमध्ये झालेल्या अमेरिका-तालिबान शांतता करारानुसार, अमेरिकेने अफगाणिस्तानमधील आपल्या सैनिकांची संख्या कमी करत, ती सुमारे आठ हजारांपर्यंत आणली होती. पेंटागॉनने याबाबत जुलैमध्ये माहिती दिली होती.
या करारानुसार, अफगाणिस्तान आणि काही दहशतवादी संघटनांनी करारामधील अटींचे पालन केले, तर २०२१पर्यंत अमेरिका तेथील सर्व लष्कर मायदेशी बोलावून घेईल.
अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी सैन्याच्या आल्यानंतर आतापर्यंत सुमारे एक लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. यामध्ये दहशतवादी, सामान्य नागरिक, अफगाणिस्तान आणि अमेरिकेच्याही सैनिकांचा समावेश आहे.