वॉशिंग्टन डी. सी. - अमेरिकेमध्ये ३ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. डेमॉक्रटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. महत्त्वाच्या राज्यांमध्ये दोन्ही नेत्यांच्या सभा सुरू आहेत. निवडणुकीच्या दोन दिवस आधी ट्रम्प यांनी निकालाबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे. ३ नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर निकाल लागण्यासाठी काही आठवडे वेळ लागण्याची शक्यता ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. तसेच मतमोजणीत घोटाळा होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
काहीतरी वाईट घडणार
पेन्सेल्व्हेनिया राज्यातील न्यूटाऊन येथे जाहीर सभा घेताना ट्रम्प यांनी सांगितले, की निवडणुकीचे निकाल येण्यास काही आठवडे थांबावे लागण्याची शक्यता आहे. कारण, मतमोजणी सुरू असताना काहीतरी वाईट घडणार आहे. यासंबधीचे वृत्त अमेरिकेतील स्थानिक माध्यमांनी दिले आहे.
न्यायालयाच्या निकालानंतर ट्रम्प यांचे वक्तव्य
अमरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मतदानासंदर्भात एक महत्त्वाचा निकाल दिला. त्यात ट्रम्प यांचे विरोधक जो बायडेन यांच्या बाजूने निकाल लागला. पेन्सलवेनिया राज्यातील निवडणूक अधिकारी मदतानाच्या तीन दिवसांनतरही गैरहजर व्यक्तींचे मत इतर मार्गाने ग्राह्य धरू शकतात. म्हणजेच जर एखादी व्यक्ती नोंदणी असलेल्या मतदान केंद्रावर न जाता पोस्टल, ऑनलाइन किंवा दुसऱ्यातर्फे मत देऊ इच्छित असेल तर ही मुदत तीन दिवसांनी वाढविण्यात आली आहे. जो बायडेन यांच्या रिपब्लिकन पक्षाने ही याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल ट्रम्प यांच्या विरोधात लागल्याने ट्रम्प यांनी निकालाला उशिर लागणार असल्याचे वक्तव्य केले.
२०१६च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पेन्सेल्व्हेनिया राज्यात ट्रम्प यांचा विजय झाला होता. ४८.१८ टक्के मते ट्रम्प यांना मिळाली होती. मेल किंवा पोस्टल मताद्वारे घोटाळा होण्याची शक्यता असते. त्यामुळे न्यायालयाच्या निकालावर ट्रम्प यांनी टीका केली आहे.