वॉशिंग्टन डी.सी - युक्रेनवरील युद्धाचे सावट कायम आहे. युक्रेनच्या सीमेवर रशियाने सव्वा लाखाहून अधिक सैन्यांची जमवाजमव केली. कोणत्याही क्षणी रशिया युक्रेनवर हल्ला करील अशी स्थिती आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. युद्ध टाळावे यासाठी अमेरिकन अध्यक्ष जो बायडेन कुठल्याही ठिकाणी आणि कधीही रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी ( US Secretary of State Antony Blinken’s ) सांगितले.
रशिया आणि युक्रेनमधील परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील परिस्थिती सामान्य करण्यासाठी जगभरातील देशही त्यांच्या वतीने पुढाकार घेत आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेण्यास सहमती दर्शवली आहे, असे व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जेन साकी यांनी सांगितले. मात्र यादरम्यान कोणताही हल्ला झाला नाही, तरच ते रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना भेटणार आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅम्युअल मॅक्रॉन यांनी पुढाकार घेऊन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी बातचीत केली. यानंतच चर्चेला पूरक वातावरण निर्माण झाले.
राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पुतीन यांच्याशी दिवसातून दोनदा दूरध्वनी संभाषण केले आणि युक्रेनमधील परिस्थितीवर जो बायडेन यांच्याशीही चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दोन्ही नेत्यांना युरोपमधील सुरक्षा आणि सामरिक स्थैर्याबाबत शिखर परिषद आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि पुतिन या दोघांनीही मान्य केले आहे. फ्रेंच रिपब्लिकच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या एलिसी पॅलेसने जारी केलेल्या वृत्तानुसार, रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास ही बैठक अशक्य आहे.
रशिया युक्रेनवर हल्ला करणार असल्याचे पाश्चिमात्य देशांनी म्हटलं आहे. पण, हे आरोप रशियाने फेटाळले आहेत. आपल्या राष्ट्रीय हद्दीत सैन्य हलवण्याचा अधिकार असल्याचेही रशियाने म्हटले आहे.
रशिया-युक्रेन वाद -
सोव्हिएत युनियनमधून वेगळा झाल्यापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात अंतर्गत संघर्ष पाहायला मिळत आहे. युक्रेन हा रशियाचाच भाग असून त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे. मात्र, अनेक रशियन हे स्वतंत्र अस्तित्व मान्य करत नाहीत. अशात युक्रेन आणि नाटो देशांची जवळीक हा रशियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. युक्रेन आणि रशियामधील संघर्षाने आंतरराष्ट्रीय राजकरणात वादंग पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - Ukraine-Russia Tensions : रशिया-युक्रेनवर युद्धाचे ढग, जो बायडेन यांनी आखली योजना