न्यूयॉर्क - अमेरिकेत वर्तमानपत्रांवर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आता फेसबुकने तांत्रिक माध्यमांच्या (अल्गोरिदम)ऐवजी तज्ज्ञ पत्रकारांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकच्या या निर्णयाचे तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. मात्र, या निर्णयाचा संकटग्रस्त वर्तमानपत्र माध्यमांना जास्त प्रमाणात फायदा होण्याची शक्यता नाही.
फेसबुकने मंगळवारी म्हटले आहे की, ते राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या बातम्या निवडण्यासाठी पत्रकारांची एक छोटी टीम बनवणार आहे. ज्यामुळे हे निश्चित करण्यात येईल की, आम्ही योग्य बातम्या समाजासमोर आणत आहोत. त्यानुसार आता बातम्या या पारंपरिक न्यूज फिड ऐवजी न्यूज टैब या सेक्शनमध्ये दिसतील. फेसबुकने निवड केलेले पत्रकार बातम्या या संकेतस्थळावरुन निवडतील. मात्र, ते त्या बातम्यांमध्ये बदल करणार नाहीत, असेही फेसबुकने स्पष्ट केले.
फेसबुकने जानेवारीमध्ये घोषणा केली होती की, ते पत्रकारितामध्ये सहयोगासाठी विशेष करुन स्थानिक वर्तमानपत्र संस्थांसाठी येणाऱया तीन वर्षांमध्ये ३००० लाख अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करणार आहे. अमेरिकेमध्ये बातम्यांचा प्रचार आणि प्रसार समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहे आणि समाज माध्यमांच्या वाढत्या प्रभावासमोर वर्तमानपत्रे संकटाचा सामना करत आहे. यामुळेच मागील १५ वर्षांमध्ये २००० वर्तमानपत्र बंद पडली आहेत. त्यामुळे लोकांना स्थानिक बातम्यांची माहिती मिळणे कठीण झाले आहे. मागील वर्षी जाहीर केलेल्या प्यू संशोधन केंद्राच्या सर्वेनुसार, २००८ ते २०१८ पर्यंत अमेरिकेतील वर्तमानत्रांमध्ये काम करणाऱया पत्रकारांची संख्या ४७ टक्के कमी झाली आहे.
फेसबुकच्या या निर्णयावर डेलावेयर विद्यापीठातील संवादशास्त्राच्या प्राध्यापक डेना यंग यांनी म्हटले आहे की, मी या निर्णयाला खूप सकारात्मक मानते, हा निर्णय खूप आशादायी आहे. मात्र, याचा समाजमाध्यमाचे व्यसनाधीन असणाऱया लोकांच्या व्यवहारामध्ये काही बदल होणार नाही, असेही त्या म्हणाल्या. तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, फेसबुक पत्रकारिता कंपनी नाही आणि म्हणून फेसबुकसाठी काम करण्याआधी मला त्यांची नैतिक आणि मजबूत पत्रकारितेसाठी असलेली वचनबद्धता पाहायची आहे.