न्युयॉर्क - अमेरिकेतील न्युयॉर्क राज्यातील सायर्कस शहरात अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली. यामध्ये 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री ही घटना घडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सायर्कस शहराच्या डाऊनटाऊन भागात एका कार्यक्रमात हा गोळीबार झाला. कार्यक्रम कोणत्या कारणासाठी आयोजित केला होता, याची माहिती पोलिसांना अद्याप समजलेली नाही. 9 जखमींमध्ये एका 17 वर्षीय मुलाचाही समावेश आहे. त्याचा डोक्यात गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. सर्व जखमी 18 ते 53 या वयोगटातील आहेत.
गोळीबाराप्रकरणी कोणालाही अद्याप अटक करण्यात आली नाही. तपास प्राथमिक टप्प्यात असल्याचे सायर्कस शहराचे पोलीस अधिकारी केटॉन बकनर यांनी सांगितले. एका गाडी चोरीच्या तपासासाठी पोलीस काल रात्री 9 वाजता कार्यक्रम स्थळी आले होते. मात्र, तेथील नागरिकांनी गोळीबार झाल्याचे पोलिसांना सांगितले.
एका इमारतीच्या पार्कींगमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहराच्या इतर भागातही गोळीबार झाल्याची शक्यता आहे. या कार्यक्रमासाठी परवानगी दिली नव्हती, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून तपास सुरू आहे.