वॉशिंग्टन - इराकमधील बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या 'कुदस फोर्स'चा म्होरक्या कासीम सुलेमानी ठार झाला. त्याच्यासह इराकी बिगरलष्करी सेनेचा कमांडर अबु महदी अल-मुहान्दीस हाही या हल्ल्यात मारला गेला. हा हवाई स्ट्राईक राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निर्देशानुसार, करण्यात आला, असे पेंटॅगनने म्हटले आहे.
जरनल सुलेमानी हा संपूर्ण इराकमधील अमेरिकेच्या महत्त्वाच्या राजकीय व्यक्ती आणि लष्करी उच्चपदस्थांवर हल्ला करण्याचे कट रचत होता. राष्ट्राध्यक्षांच्या निर्देशांनुसार अमेरिकन लष्कराने महत्त्वाच्या अमेरिकन अधिकाऱ्यांच्या संरक्षणार्थ ही कारवाई केली आहे, असे अमेरिकेच्या वतीने पेंटॅगनने म्हटले आहे. या हल्ल्यामुळे अमेरिका आणि इराक-इराण दरम्यानचे संबंध आणखीनच बिघडणार आहेत.
कासीम सुलेमानी हा इराणच्या सशस्त्र क्रांतिकारी संघटना कुदस फोर्सचा म्होरक्या होता. अमेरिकेने या संघटनेला विदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. कुदस फोर्स ही लेबनीज हिज्बुल्लाह, हमास आणि गाझा पट्टी आणि पश्चिम किनारपट्टीवरील पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद, येमेनी हौथी, इराक, सीरिया आणि अफगाणिस्तानातील शिया बिगरलष्करी सशस्त्र गटांना पाठिंबा देत होती.
इराणच्या बिगरलष्करी सशस्त्र गटांनी आणि इतर निदर्शकांनी बगदादमधील अमेरिकन दूतावासावर हल्ला चढवला होता. याविरोधात कारवाई करणार असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. यापूर्वी अमेरिकेने निदर्शकांच्या गटांवर हल्ला चढवत हवाई स्ट्राईक केला होता. यामध्ये PMF मधील २५ जण ठार झाले होते. याचा सूड घेण्यासाठी या गटांकडून अमेरिकन दूतावासावर हल्ला चढवण्यात आला होता.