न्यूयॉर्क –जम्मू आणि काश्मीरचा विषय संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. पाकिस्तानची प्रत्येक बाजू ही चुकीची असल्याचे भारताने दाखवून दिल्याचे संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी सांगितले.
भारत-पाकिस्तानबाबतचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नोव्हेंबर 1965 पासून उपस्थित झाला नाही. पाकिस्तानकडून काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी सोमवारी सांगितले.
पुढे ते म्हणाले, की चीन वगळता सर्व देशांनी काश्मीरचा मुद्दा हा भारत-पाकिस्तानमधील द्विपक्षीय असल्याचे आजवर अधोरेखित केले आहे. पाकिस्तानकडून द्विपक्षीय देशांमधील प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करणे हे नवे नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी मागील ऑगस्टमध्ये 1972 च्या द्विपक्षीय शिमला कराराचा उल्लेख केला. पाकिस्तानचे प्रयत्न हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमाप्रमाणे नाहीत. जर पाकिस्तानने असेच प्रयत्न राहिले तर त्यांची संयुक्त राष्ट्रसंघात कोणीही दखल घेणार नाही.
दरम्यान, गेल्या महिन्यात पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्तच्या कार्यक्रमातही जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न उपस्थित केला होता. जम्मू आणि काश्मीरचे 370 कलम रद्द करणे हा देशाचा अंतर्गत असल्याचा मुद्दा भारताने ठोसपणे आंतररराष्ट्रीय व्यासपीठावर मांडला आहे.