न्यूयॉर्क - भारतविरूद्ध द्वेषयुक्त भाषणे देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा वापर केल्याप्रकरणी शांतताविषयक उच्चस्तरीय परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. भारताविरोधात गरळ ओकण्यापेक्षा आपल्या देशातील अल्पसंख्याकांचे संरक्षण करावे, असे भारताने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानच्या शिष्टमंडळाकडून शांततेसंदर्भात केलेली चर्चा, ही संयुक्त राष्ट्र महासभेचे, पाकिस्तानच्या लज्जास्पद नोंदींकडून दुसरीकडे लक्ष वळविण्याचा केलेला एक अयशस्वी प्रयत्न आहे, असे संयुक्त राष्ट्र महासभेच्या 74 व्या परिषदेत भारताच्या प्रतिनीधी पालोमी त्रिपाठी म्हणाल्या.
पाकिस्तानमधील मानवाधिकार उल्लंघनाच्या घटना आणि धार्मिक, वांशिक अल्पसंख्याकांसोबतची भेदभावपूर्ण वागणूक हे आंतरराष्ट्रीय समुदायासाठी सतत चिंतेचे कारण आहे. हिंदू, ख्रिश्चन आणि शीख यासारख्या धार्मिक अल्पसंख्याकांचे मानवी हक्क आणि सन्मानाचे उल्लंघन करण्यासाठी निंदनीय कायदे वापरले जातात. पाकिस्तानात विशेषत: महिला आणि मुली असुरक्षित असतात. कारण त्यांचे अपहरण केले जाते, त्यांच्यावर बलात्कार होता, तसेच त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जाते, असेही त्या म्हणाल्या.