वाशिंग्टन डी.सी - जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार झाला असून परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. गेल्या 24 तासामध्ये जगात तब्बल 5 हजार 795 जणांचा मृत्यू झाला असून 3 लाख 36 हजार 772 बाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेनंतर भारतामध्ये कोरोनाचे सर्वांत जास्त रुग्ण आढळले.
जगभरामध्ये 3 कोटी 6 लाख 85 हजार 288 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 9 लाख 55 हजार 695 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 कोटी 23 लाख 27 हजार 237 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. अमेरिकेमध्ये 69 लाख 25 हजार 941 कोरोना रुग्ण आढळले, तर 2 लाख 3 हजार 171 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर भारतात 53 लाख कोरोना रुग्ण आढळले असून भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यापाठोपाठ ब्राझिल, रशिया आणि पेरूमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
कोरोनावरील योग्य लसीसाठी विविध देशांमध्ये सुरू असलेल्या 140 हून अधिक प्रयोगांच्या यशाची प्रतीक्षा सर्वच जण उत्सुकतेने करीत आहे. लसीचे यश हे संशोधनाच्या यशावर अवलंबून आहे, जे संशोधन व्यापक स्तरावर विविध टप्प्यांमध्ये करण्यात आले असून संशोधनाच्या प्रत्येक टप्प्यावर लस यशस्वी झाली पाहिजे. सध्याच्या घडीला, लसीच्या परिणामकारकतेबद्दल संपूर्ण विश्वास निर्माण होत नाही, तोपर्यंत लस तयार करणाऱ्या कंपन्या आणि सरकारांनी संयम पाळणे हेच महत्त्वाचे आहे.