हैदराबाद- जगातील कोरोना रुग्णसंख्येने अडीच कोटींचा टप्पा ओलांडला आहे. जगभरात 2 कोटी 64 लाख 71 हजार 718 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत कोरोनामुळे संपूर्ण जगात 8 लाख 73 हजार 223 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 1 कोटी 86 लाख 64 हजार 286 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
अमेरिकेत 63 लाख 35 हजार 244 रुग्णांची नोंद झाली आहे. त्या पाठोपाठ ब्राझीलमध्ये 40 लाख 46 हजार 150 रुग्ण आढळले आहेत. भारत जगात तिसऱ्या स्थानी असून भारतात 39 लाख 36 हजार 747 रुग्णांची नोंद झाली. भारतापाठोपाठ रशिया आणि पेरु देशामध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळते.
गेल्या २४ तासांमध्ये न्यूझीलंडमध्ये पाच नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पंतप्रधान जॅकिंडा अर्डर्न यांनी देशातील सध्या सुरू असलेले निर्बंध कायम सप्टेंबरच्या मध्यापर्यंत ठेवणार असल्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना इशारा दिला आहे, की व्यवस्था पूर्ववत करताना कोविडच्या धोक्याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. कोरोना महामारी संपल्याचा गैरसमज करुन घेऊ नये.