वॉशिंग्टन डी सी - सध्या जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. आत्तापर्यंत लाखो नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे जगभरात कोरोनावर लस शोधून काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेतील पिट्सबर्ग विद्यापीठातील वैद्यकीय संशोधन विभागाने कोरोनाच्या लसीची प्राण्यावर यशस्वी चाचणी केली आहे. त्यामुळे कोरोनावर औषधोपचार उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे.
संशोधक आता अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे या लसीची मानवी शरीरावर चाचणी घेण्यासाठी परवानगी मागणार आहे. मानवी शरीरावर ही लस यशस्वीपणे काम करू लागली तरी ही बाजारात येण्यासाठी जवळपास एक वर्ष लागू शकते.
हेही वाचा - आर्थिक आणि सामाजिक स्तर उच्च असूनही तज्ज्ञ देत आहेत सोशल डिस्टंसिंगवर भर
संशोधकांनी नव्याने तयार केलेली लस उंदरावर वापरली आहे. उंदरांनी या लसीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यापूर्वी संशोधकांनी SARS-CoV आणि MERS-CoV या दोन विषाणूंच्या चाचण्या केल्या होत्या. हे दोन्ही विषाणू कोरोनाच्या SARS-CoV-2 विषाणूशी मिळते जुळते आहेत. या विषांणूविरोधात मानवी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी स्पाईक प्रोटीन फायद्याचे ठरते, अशी माहिती वैद्यकीय संशोधन विभागाच्या अँड्रीया गोम्बेटो यांनी दिली.