वॉशिंग्टन डी.सी - जो बायडेन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. चुरशीच्या लढतीत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नमवत बायडन यांनी सरशी साधली. अमेरिकेचे नेतृत्व बदलले असले. तरी अमेरिकेची चीनप्रती असलेली भूमिका बदलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आताही अमेरिका चीनच्या विस्तारवादी भूमिकेच्या विरोधात आहे. जो बायडन यांनी नुकतेच एका मुलाखतीमध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या नेतृत्वावर प्रतिक्रिया दिली. शी जिनपिंग यांच्या बॉडीमध्ये डेमोक्रॅटिकमधील (लोकशाही) 'डी' नावाचे लहान हाड सुद्धा नाही, असे बायडेन म्हणाले. तथापि, बायडेन यांच्या वक्तव्यानंतर चीनकडून आद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.
शी जिनपिंग हे एक कठोर व्यक्ती आहेत. त्यांना लोकशाहीची समज नाही. एका लोकशाही देशाचे नेतृत्व करण्यासाठी जे गुण हवेत. ते त्यांच्यामध्ये नाहीत. तसेच मला वाटत नाही की मी त्यांच्यावर टीका करत आहे. मी तेच सांगत आहे. जे खरे आहे. शी जिनपिंग यांच्या बॉडीमध्ये डेमोक्रॅटिकमधील (लोकशाही) 'डी' नावाचे लहान हाडही नाही, असे बायडेन म्हणाले. समुद्रामधील अमेरिकेच्या वाढत्या कारवायांबद्दल चीन आधीच संतप्त आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढू शकतो.
चीन-अमेरिका संबंध -
अमेरिका आणी चीनदरम्यान मजबूत स्पर्धा होणार आहे. मात्र, जिनपिंग आणि ट्रम्प यांच्या धोरणासारखी ती नसेल. आम्ही आंतरराष्ट्रीय नियमांवर लक्ष केंद्रित करणार आहोत, असे बायडेन यांनी सांगितले. बराक ओबामा यांच्या कार्यकाळात बायडेन आणि जिनपिंग यांची उपराष्ट्रपती म्हणून अनेकदा भेट झाली आहे. शी जिनपिंग आणि बायडेन हे एकमेंकाना ओळखतात. त्यांच्या अनेककदा भेट झाली होती. बायडेन यांनी शी जिनपिंग यांच्याबरोबर 27 हजार किमीचा प्रवासही केला आहे. सध्या अमेरिका चीनसोबत असलेले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. यापूर्वी ट्रम्प यांच्या कार्यकाळात दोन्ही देशांमधील संबंध बर्यापैकी खराब झाले होते.
बायडेन यांची इराणवर प्रतिक्रिया -
बायडेन यांनीही इराणबाबत अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली. इराणवरील अणुकराराच्या अटींचे पालन करण्याचे निर्बंध हटवले जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. 2018 मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकतर्फी करारातून माघार घेत इराणवर कठोर निर्बंध लादले होते.