ब्राझिलिया : ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनेका हे संयुक्तपणे तयार करत असलेल्या कोरोना लसीच्या चाचणीदरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमधील आरोग्यसंस्था अन्व्हिसाने ही माहिती दिली. दरम्यान, असे असले तरी ब्राझीलमधील या लसीची चाचणी सुरूच राहणार असल्याचेही संस्थेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या स्वयंसेवकाला लसीचा डोस देण्यात आला होता, की केवळ प्लासेबोचा डोस देण्यात आला होता याबाबत कोणतीही माहिती या संस्थेने दिली नाही. यानंतर या चाचणीत सहभागी असणाऱ्या सर्वांची विशेष तपासणी केली जात आहे. तसेच, संस्थेने सुरक्षेच्या बाबतीत सर्व खबरदारी बाळगली असल्यामुळे चाचणी थांबवण्याची गरज नसल्याचे या संस्थेने म्हटले आहे. ब्राझीलमध्ये ऑक्सफोर्डच्या वतीने चाचणी पार पाडत असलेल्या अन्व्हिसानेच चाचणी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे ऑक्सफोर्ड विद्यापीठाने म्हटले आहे.
दरम्यान, अॅस्ट्राझेनेकाच्या प्रवक्त्यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत काहीही बोलण्याचे टाळले. मात्र, चाचणी थांबण्यासारखे काहीही घडले नाही असे संकेत त्यांनी दिले. कोरोना लसीच्या चाचण्या मोठ्या स्तरावर सुरू आहेत. त्यामुळे, एका विशिष्ट व्यक्तीबाबत आम्ही काही बोलू शकत नाही. सुरक्षेचे सर्व नियम पाळूनच या चाचण्या पार पडत आहेत, त्यामुळे त्या थांबण्याचे कोणतेही कारण नाही असे या कंपनीचे प्रवक्ते म्हणाले.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, ब्राझीलमध्ये आतापर्यंत ५२ लाख ७३ हजार ९५४ कोरोना रुग्ण आढळले असून, एक लाख ५४ हजार ८३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : निवडणुकीसाठी निधी जमा करण्यात जो बायडेन अव्वल, ट्रम्प पिछाडीवर