वॉशिंग्टन डी. सी - नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा २० जानेवारीला शपथविधी सोहळा नियोजित आहे. या कार्यक्रमाच्या पाश्वभूमीवर राजधानी वॉशिंग्टन डी. सी मध्ये शस्त्रसज्ज २० हजार तैनात करण्यात येत आहेत. मागील आठवड्यात ट्रम्प समर्थकांनी संसेदत धुडगूस घातला होता. यात चार जणांचा मृत्यू झाला होता. बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यावेळीही आंदोलन होणार असल्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी वर्तवली आहे. त्या पाश्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.
अनुचित घटना घडू नये म्हणून सुरक्षा दले सज्ज -
कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून संसदेबाहेर आणि महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात येणार आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी नागरिकांना हिंसाचार न करण्याचे आवाहन केले आहे. ट्रम्प समर्थकांनी संसदेत हिंसाचार केल्यानंतर या घटनेचे जगभरात पडसाद उमटले होते. आता ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा खटला दाखल करण्यात आला असून हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह गृहात त्याला मंजुरी मिळाली आहे.
२३२ विरुद्ध १९७ मतांनी हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हमध्ये महाभियोगाचा ठराव मंजुर झाला. ट्रम्प यांच्या रिपब्लिकनच्या पक्षाच्या १० लोकप्रतिनिधींनीही महाभियोग मंजूर करण्याच्या बाजूने मत दिले. सिनेटमध्ये १९ जानेवारीला महाभियोगाच्या प्रस्तावावर मतदान घेतले जाणार आहे.
एकाच राष्ट्राध्यक्षावर कार्यकाळात दुसऱ्यांदा महाभियोगाचा खटला -
एखाद्या राष्ट्राध्यक्षावर त्याच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा महाभियोग चालण्याची घटना अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. सभागृह अध्यक्षा नॅन्सी पॅलोसी यांनी महाभियोग प्रक्रियेची अधिकृत माहिती दिली. हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर आता सिनेटमध्ये खटला चालणार आहे. मात्र, ट्रम्प यांच्या कार्यकाळास अवघे ६ दिवस राहिले आहेत. २० जानेवारीला नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन शपथ घेणार आहेत. त्याआधी ही प्रक्रिया पूर्ण झाली तर ट्रम्प यांच्यावरील खटला यशस्वी होईल.