ओंडर्मन - सुदानमधील एका न्यायालयाने एका ३६ वर्षीय शिक्षकाच्या हत्येप्रकरणी २९ गुप्तचर अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. अहमद अल-खैर असे या शिक्षकाचे नाव असून ते बऱ्याच काळासाठी सुदानमधील नेते राहिले होते. ते ओमान अल-बशीर यांच्याविरोधात निदर्शने करत होते.
खैर यांना निदर्शनांमध्ये सहभागी झाल्याप्रकरणी फेब्रुवारीमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना मारहाण करण्यात आली होती. तसेच, छळही करण्यात आला होता. या शिक्षकावर प्राणघातक अत्याचार केल्याप्रकरणी २९ अधिकारी दोषी आढळले आहेत. खैर यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय, आणखी चार जणांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, सात जणांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी सुरुवातीला खैर यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचा दावा केला होता, असे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. मात्र, नंतरच्या चौकशीत मारहाणीमुळे झालेल्या गंभीर दुखापतीमुळे खैर यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
या सुदानच्या सार्वभौम प्रशासकीय मंडळाचे सदस्य अल-फाकी सुलेमान यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच, या निर्णयामुळे सुदानी लोकांच्या न्यायपालिकेवरील विश्वास वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
ओंडर्मन येथील न्यायालयातर्फे या प्रकरणाचा निकाल जाहीर करतेवेळी शेकडो खैर समर्थकांनी आणि निदर्शकांनी न्यायालयाबाहेर गर्दी केली होती. काही जण राष्ट्रीय ध्वज हातात घेऊन तर काही खैर यांचे छायाचित्र असलेले फलक हातात घेऊन उपस्थित होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वांनी जल्लोष केला.