मुंबई- स्वतःच्या पोटात अमलीपदार्थ असलेल्या कॅप्सूल लपवून तस्करी करणाऱ्या दोन परदेशी तस्करांना मुंबईच्या डीआरआय पथकाने अटक केली. हे दोन्ही तस्कर टांझानिया देशाचे नागरिक आहेत. 22 एप्रिलला ही कारवाई करण्यात आली होती. टांझानिया मधील दर- ए सलाम येथून मतांजी कार्लोस अदम आणि राशीत पोल्स युला हे दोन अमलीपदार्थ तस्कर मुंबई विमानतळावर दाखल झाले होते.
पोटात लपवले होते कोकेन
या दोन आरोपींना डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता, त्यांच्या पोटामध्ये त्यांनी अमलीपदार्थ लपवले असल्याचे लक्षात आले. त्यानंतर दोन्ही आरोपींना मुंबईतील न्यायालयामध्ये हजर करून वैद्यकीय तपासणीसाठी याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर सदरच्या या दोन आरोपींना जेजे रुग्णालयमध्ये नेण्यात आले होते. ज्या ठिकाणी त्यांच्या एक्स-रे चाचणीमध्ये त्यांच्या पोटात अमलीपदार्थच्या कॅप्सूल लपवल्या असल्याचं आढळून आले.
6 दिवस जेजे रुग्णालयांमध्ये-
जवळपास 6 दिवस जेजे रुग्णालयांमध्ये वैद्यकीय निरीक्षणाखाली या दोन आरोपींना ठेवण्यात आल्यानंतर मतांजी कार्लोस अदम याच्या पोटातून 54 अमली पदार्थाच्या कॅप्सूल काढण्यात आल्या. तर राशित पोल्स युला त्याच्या पोटातून 94 कॅप्सूल काढण्यात आलेले आहेत. या दोन्ही आरोपींच्या पोटातून काढण्यात आलेल्या कॅप्सूलचे वजन 2 किलो 225 ग्राम मिळून आले. सदरच्या कॅप्सूलमध्ये कोकेन हे अमलीपदार्थ लपवण्यात आले होते, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 13 कोटी रुपये असल्याचे समोर आलेला आहे.