वॉशिंग्टन डी. सी - जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येनं वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरामध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरामध्ये आतापर्यंत 5 लाख 28 हजार 378 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तब्बल 1 कोटी 11 लाख 81 हजार 818 जण कोरोनाबाधित आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे, 62 लाख 92 हजार 23 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
अमेरिकेत जवळपास 28 लाख 90 हजार 588 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 32 हजार 101 जणांचा बळी गेला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये 15 लाख 43 हजार 341 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 63 हजार 254 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. रशियामध्ये 6 लाख 67 हजार 833 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 9 हजार 859 जणांचा बळी गेला आहे. तर यापाठोपाठ भारत यूके, स्पेनला कोरोनाचा फटका बसला आहे.
जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असताना, यूस, भारत, डेन्मार्क, इटली या देशांनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यास सुरवात केली आहे. लॉकडाऊनमध्ये सूट दिल्याने नागरिकांचा रस्त्यावरील वावर वाढला तर कोरोनाचा समूह संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूची सुरुवात मध्य चीनमधील वुहान प्रांतातून झाली होती. त्यानंतर हा विषाणू झपाट्यानं जगभरात पसरला. चीनमध्ये हा विषाणू मोठ्या प्रमाणात आटोक्यात आला.