मुंबई - अभिनेता सिद्धार्थ मेननने नुकतीच राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली. ‘जून’ या मराठी चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले. आता तो एका हिंदी गाण्यातून सुद्धा दिसणार आहे. ‘तेरी मेरी दास्तान’ या हिंदी गाण्याच्या अल्बम मधून तो या क्षेत्रात पदार्पण करीत आहे. त्याच्या जोडीला आहे मराठमोळी पल्लवी पाटील. ते दोघे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत या म्युझिक अल्बमच्या माध्यमातून. महत्वाचं म्हणजे हा अल्बम व्हिडीओ पॅलेस निर्मित करीत असून त्यांचेही हिंदी अल्बम निर्मीती क्षेत्रात पदार्पण होत आहे.
या गाण्यात सिद्धार्थचा शांत तर पल्लवीचा काहीशा चुलबुला अंदाज पहायला मिळणार आहे. प्रत्येक प्रेमकथेत असणारा ‘प्रेम’ हा समान धागा सोडला तर प्रत्येकाच्याच प्रेमाची एक निराळी गोष्ट असते अशीच प्रेमात पाडणारी ‘लव्हेबल’ गोष्ट या अल्बम मधून उलगडणार आहे. अब्दुल शेख याने गायलेल्या या गाण्याला विदुर आनंद यांचे संगीत लाभले आहे. या गाण्याचे दिग्दर्शन फुलवा खामकर हिने केले आहे.
‘प्रेम’ या अडीच अक्षरी शब्दांत दडलेली भावना लाखमोलाची असते. प्रत्येकाच्या प्रेमाची एक वेगळीच कहाणी असते. राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि अभिनेत्री पल्लवी पाटील यांच्या प्रेमाची रोमँटिक दास्तान लव्हेबल अंदाजात लवकरच आपल्याला पहायला मिळणार आहे. ‘तेरी मेरी दास्तान’ अल्बम मधील गाणं काश्मीरमधील हटके लोकेशनवर चित्रीत केलं आहे. काश्मीरचे नेत्रसुखद सौंदर्य दाखवण्याचे काम राष्ट्रीय पारितोषिक विजेते छायालेखक अमोल गोळे यांनी केले आहे.
‘तेरी मेरी दास्तान’च्या शूटिंग अनुभवाबद्दल बोलताना सिद्धार्थ आणि पल्लवी म्हणाले की, “३ डिग्री तापमानात आम्ही हे शूट पूर्ण केलं असून ते आम्ही खूप एन्जॉय केलं. गाण्याची ही रोमँटिक सफर प्रेक्षकसुद्धा एन्जॉय करतील असा आम्हाला विश्वास आहे.”
हेही वाचा - गायक किशोर कुमार यांची आज 93 वी जयंती; चाहत्यांनी मंदिर, संग्रहालय बनवून आठवणींना ठेवलंय जिवंत