मुंबई - नाटकांमधून कामं केल्याने कलाकारांच्या अभिनयाचा बेस पक्का होतो असे म्हणतात. खरंतर रंगभूमीवर अनेक मराठी नाटकं बघायला मिळत आहेत. मराठी प्रेक्षक तसा नाटकवेडाच. त्यामुळे मराठी नाटकांचे प्रयोग होत असतात आणि मराठी नाटकांमध्ये अनेक प्रयोग होत असतात. भारतामध्ये नाटकं जिवंत राहण्यासाठी चळवळ सुरू आहे आणि त्यात मराठी नाटके आघाडीवर आहेत. ही चळवळ दूरपर्यंत पोहोचावी म्हणून मराठी नाटकांचा महोत्सव भरविला जातो ज्यात विविधांगी नाटकांची मेजवानी रसिक प्रेक्षकांना मिळत असते. त्याच अनुषंगाने नुकताच 'प्रतिबिंब - मराठी नाट्य उत्सव २०२३' हा नाट्यमहोत्सव पार पडला.
'प्रतिबिंब - मराठी नाट्य उत्सव २०२३' या महोत्सवासाठी प्लॅनेट मराठी आणि एनसीपीए म्हणजेच नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्टस् या संस्था एकत्र आल्या होत्या. मराठी नाटकांच्या प्रयोगांबरोबर अनेक चर्चासत्रे आणि जाहीर मुलाखती झाल्या. त्यात सर्वात भाव खाऊन जाणारी मुलाखत होती ज्येष्ठ नाट्यकर्मी मकरंद देशपांडे यांची. 'प्रतिबिंब' मध्ये मकरंद देशपांडे यांनी आपली परखड मते मांडली, अगदी जागतिक युद्ध निरर्थक आहे हेदेखील ठासून सांगितले. इथे मकरंद देशपांडे लिखित, दिग्दर्शित,अभिनित 'सैनिक' या एकांकिकेचा प्रथम प्रयोग झाला. यात त्यांनी एका वॉर फोटोग्राफरची भूमिका साकारली आहे. ही एकांकिका जागतिक युद्धावर बेतलेली असून अनेक मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकते.
'प्रतिबिंब' च्या शेवटच्या सत्रात मकरंद देशपांडे प्रेक्षकांच्या भेटीला येत असून थिएटरपासून सुरु झालेल्या त्यांच्या प्रवासाबद्दल प्रेक्षकांना या मुलाखतीच्या माध्यमातून कळणार आहे. मकरंद देशपांडे यांनी हिंदी आणि मराठी नाट्यक्षेत्रात उत्तम काम केले आहे. ते 'सैनिक' या एकांकिकेतील एक तासाच्या मोनोलॉगविषयी बोलतील ज्यातून त्यांना असलेला सैनिकांबद्दलचा आदर आणि आत्मीयता दिसून येईल.
तसेच थिएटर चळवळ, आणि इतर वादग्रस्त वाटतील अशा विषयांवर बिनदिक्कत परखड मतं मांडताना दिसतील. प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले की, 'प्रतिबिंब'ची शेवटची मुलाखत अशा व्यक्तीची आहे जिने थिएटरवर अधिराज्य गाजवलं आहे. मकरंद देशपांडे यांनी अनेक आठवणी व अनुभव सांगितले असून त्यांची मतं आणि खंत सुद्धा ऐकताना प्रेक्षकांना वेगळा अनुभव मिळेल.'
हेही वाचा -
१. Haddi Movie : नवाजुद्दीनच्या 'हड्डी' चित्रपटात 300 ट्रान्सजेंडर दिसणार
२. Honey Singh Death Threat : हनी सिंगला जीवे मारण्याची धमकी, गोल्डी ब्रारने पाठवली व्हॉईस नोट
३. Release Date Of Subhedar : 'सुभेदार’च्या प्रदर्शन तारखेची घोषणा झाली, टीझरचेही झाले अनावरण