मुंबई: अजय-अतुल या संगीतकारद्वयींमधील अतुल गोगावले इतर संगीतकारांकडेसुद्धा गायक म्हणून काम करताना दिसतो. नुकतेच त्याने संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘गुल्हर’ (Marathi movie 'Gulhar') चित्रपटासाठी एक गाणे रेकॉर्ड केले. साधी सोपी शब्दरचना आणि त्याच तोलामोलाचं संगीत हा या गाण्याचा प्लस पॅाइंट आहे. आजवरच्या आपल्या करियरमधील हे गाणं खूप वेगळं आणि मनस्वी आनंद देणारं असल्याची भावना अजय गोगावलेनं व्यक्त केली आहे. या गाण्याचं संगीत थेट हृदयाला भिडणारे असल्याचेही अजयचे म्हणणे आहे.
देश-विदेशातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत महत्त्वाचे मानले जाणारे पुरस्कार पटकावणाऱ्या 'गुल्हर'ची कथा मोहन पडवळ यांनी लिहीली असून, संजय नवगिरे यांनी पटकथा व संवादलेखन केलं आहे. या चित्रपटात एका ११ वर्षाच्या मुलाची कथा पहायला मिळणार आहे. रवी काळे, भार्गवी चिरमुले, विनायक पोद्दार, माधव अभ्यंकर, सुरेश विश्वकर्मा, किशोर चौगुले, रुक्मिणी सुतार, शिवानी बावकर, गणेश कोकाटे, कपिल कदम, पुष्पा चौधरी, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, मंजिरी यशवंत, स्वप्निल लांडगे, रेश्मा फडतरे, सचिन माळवदे, देवेंद्र वायाळ, गणेश शितोळे आदि कलाकारांनी या चित्रपटात विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.
विशाल पाटील यांचे नृत्य दिग्दर्शन आहे, तर छायालेखन व संकलन कुमार डोंगरे यांनी केले आहे. केदार दिवेकर यांनी पार्श्वसंगीत दिले असून, निखिल लांजेकर आणि हिमांशू आंबेकर यांनी साऊंड डिझाईन केले आहे. डिआय योगेश दीक्षित यांनी केले असून अमर लष्कर या चित्रपटाचे प्रोजेक्ट हेड आहेत. आयडियल व्हेंचरच्या बॅनरखाली निर्माते शांताराम (आप्पा) मेदगे, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, अबिद सय्यद यांनी 'गुल्हर'ची निर्मिती केली आहे. 'गुल्हर'चं दिग्दर्शन रमेश साहेबराव चौधरी यांनी केलं आहे. अजय गोगावलेच्या आवाजातील 'आभाळाने पंख हे पसरले...' हे गाणं नुकतेच रसिकांसमोर सादर करण्यात आलं आहे. हे गाणं वैभव कुलकर्णी यांनी लिहीलं असून, संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांनी संगीतबद्ध केलं आहे. ‘गुल्हर' हा चित्रपट येत्या ६ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.