मुंबई - 'स्कॅम १९९२' या गाजलेल्या वेब सिरीजनंतर निर्मात्यांनी या मालिकेचा सीक्वल जाहीर केला आहे. पहिल्या भागात हर्षद मेहताना केलेल्या ५ हजार कोटींच्या घोटाळ्याची कथा मांडण्यात आली होती. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि लोकप्रियतेच्या कळसावरही गेली. आता दुसऱ्या भागात २००३ मध्ये झालेल्या ३० हजार कोटींच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याची कथा दाखवण्यात येणार आहे. अब्दुल करीम तेलगी याने हा अतिप्रचंड स्कॅम करुन जगाला स्तंभित केले होते.
या मालिकेचा टीझर जारी करत निर्माता हंसल मेहता यांनी एक ट्विट केले आहे. नव्या मालिकेची घोषणा करताना मेहता यांनी लिहिलंय की, 'लाईफ में आगे बढना हैं तो डेरींग तो करना पडेगा ना डार्लिंग ! सादर आहे 'स्कॅम २००३.' याचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी करत आहेत. या मालिकेत अभिनेता गगन देव रीवर हा अब्दुल करीम तेलगी ही मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे. लवकरच याचा ट्रेलर रिलीज होईल. ही मालिका २ सप्टेबर पासून प्रसारित होईल.'
'स्कॅम २००३' मालिकेचा टीझर रंजक बनला आहे. काही दृष्यांसह ग्राफिक्सचा वापर केलेल्या या टीझरची सुरुवात व्हाईस ओव्हरने होते. १९९२ मध्ये हर्षद मेहताने देशात सर्वात मोठा ५ हजार कोटींचा फायनॅन्शिअल स्कॅम केला होता. २००३ मध्ये इतका मोठा स्कॅम झाला की गणितज्ज्ञांच्या या देशात झीरो कमी पडले. तीन नव्हे तर ३० हजार करोडचा हा घोटाळा होता, खेळ मोठा होता आणि खेळाडू...तेलगी बद्दल ऐकले असेल ना? अब्दुल करीम तेलगी. तेलगीच्या मते पैसे कमावले जात नाहीत तर बनवले जातात.', अशा आशयाचा हा टीझर मालिकेबद्दलची उत्कंठा वाढवतो.
अब्दुल करीम तेलगी हा कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील खानपूर या छोट्या गावचा रहिवासी. त्याचे रेल्वेत नोकरी करणारे वडील वारले आणि कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले. बेळगावमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने मुंबई गाठली, पडेल ती कामे केली. पण त्याची पैसे कमावण्याची हाव फार मोठी होती. यातून त्याला तरुंगवारीही करावी लागली आणि इथेच त्याची भेट झाली राम रतन सोनी याच्याशी. तो गव्हर्न्मेंट स्टॅम्प व्हेंडर म्हणून कोलकात्यात काम करत होता. इथेच दोघांनी या महाघोटाळ्याची योजना आखली आणि देशाला हादरवून टाकणारा ३० हजार कोटीचा घोटाळा केला. ही कथा आता नव्या मालिकेतून रंजक पद्धतीने सादर होणार आहे.
हेही वाचा -
१. Kangana Ranaut : कंगना रणौतचा हॉरर कॉमेडी 'चंद्रमुखी २'चा फर्स्ट लूक प्रदर्शित
३. Nitin Desai Suicide Case : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी फायनान्स कंपनीविरोधात गुन्हा दाखल