मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री काजोल ५ ऑगस्ट रोजी आपला ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. आजचा दिवस तिच्यासाठी खूप खास आहे. तिच्या जवळचे स्नेही आणि अनेक सेलेब्रिटी तिला वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा देत आहेत. यामध्ये तिचा पती अजय देवगणने केलेली पोस्ट तिच्यासाठी अगदी स्पेशल आहे. त्याने शुभेच्छा देण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो काजोलसोबत दिसत असून त्याने खास स्टाईलमध्ये जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अजय देवगणने पत्नीवर केला कौतुकाचा वर्षाव - अजय देवगणने काजोलचे कौतुक करताना लिहिले आहे, तारीफ करूं क्या तेरी, हॅप्पी बर्थडे काजोल. सोशल मीडियावर अजयची ही पोस्ट खूप व्हायरल झाली आहे. चाहत्यांनीही काजोलसाठी वाढदिवसाचे संदेश पाठवायला सुरुवात केली आहे. अजय आणि काजोलची मुलगी नीसा आईच्या वाढदिवसानिमित्त खास लंडनहून मुंबईत आली आहे. नीसा आणि अजय देवगण यांना मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले होते.
अजय काजोलचे डेटिंग - 'हलचल' चित्रपटाच्या सेटवर अजय आणि काजोल पहिल्यांदा भेटले होते. काजोलचा बिनधास्त स्वभाव आणि बडबड करण्याची सवय शांत राहणाऱ्या अजयला आवडत नव्हती. त्यावेळी दोघेही वेगवेगळ्या व्यक्तींसोबत रिलेशनशीपमध्ये होते. मात्र त्यांचे आपआपल्या पार्टनरशी फारसे जमले नाही व त्यांनी ब्रेकअप घेतला. पुढे जाऊन त्यांनी एकमेकांना डेटिंग करायला सुरुवात केली आणि त्यांच्यातील हे प्रेम लग्नाच्या सप्तपदींपर्यंत पोहोचले.
अजय-काजोल यांचा विवाह - अजय आणि काजोल यांचे १९९९ मध्ये लग्न झाले होते. त्या काळात काजोल अक्षय कुमारसोबत लग्न करणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. परंतु या सर्व अफवा निघाल्या आणि अजयसोबत काजोलचा सुखाचा संसार सुरू झाला. आज त्यांच्या संसारवेलीवर नीसा आणि युग ही दोन छान फुले फुलली आहेत.
'द ट्रायल - प्यार कानून और धोका' या वेब सिरीजमध्ये काजोलने केलेली भूमिका संस्मरणीय ठरली होती. काजोल अलीकडेच 'लस्ट स्टोरी २' या चित्रपटात झळकली आहे. 'इश्क', 'गुंडाराज', 'दिल क्या करे', 'राजू चाचा', 'प्यार तो होना ही था', 'तानाजी द अन संग वॉरियर' यासारख्या चित्रपटातून अजय देवगण आणि काजोलने एकत्र भूमिका साकारल्या आहेत.
हेही वाचा -
१. kajol devgan : काजोलने आपल्या अभिनयाच्या जोरावर काबीज केली बॉलिवूड चित्रपटसृष्टी....
३. Nitin Desai Suicide Case : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी फायनान्स कंपनीविरोधात गुन्हा दाखल