मुंबई - अत्यंत प्रतिभाशाली अभिनेता नाना पाटेकर हल्ली फारसा चित्रपटांतून दिसत नाही. 'द काश्मीर फाईल्स' च्या अभूतपूर्व यशानंतर लेखक दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत ज्याचे नाव आहे द व्हॅक्सिन वॉर. या चित्रपटाची निर्माती आहे पल्लवी जोशी आणि बऱ्याच दिवसांनंतर नाना पाटेकर मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. नुकतीच नाना पाटेकरांनी आमचे प्रतिनिधी कीर्तीकुमार कदम यांच्यासोबत गप्पा मारताना एक किस्सा सांगितला.
तुमचे हिंदी चित्रपटसृष्टीतील खास मित्र कोण आहेत हे विचारल्यावर नाना पाटेकर म्हणाले, 'तसे माझे अनेक मित्र आहेत. परंतु माझे जवळचे खूप कमी आहेत. नेहमी भेटणं होत नाही परंतु दोस्ती कायम आहे. त्यात आहेत मिथुन (चक्रवर्ती), डॅनी (डेंगझोन्गपा), अनिल (कपूर). ऋषी कपूर बरोबर माझी खास दोस्ती होती. तो खूप स्पष्टवक्ता होता जे मला भावायचे. मी त्याला म्हणालो की ये एकदा घरी, नीतू भाभी ला घेऊन. तो म्हणाला की मी घरी येतो, पण तुझ्या घरात दारू नसणार. मीच घेऊन येतो. तो सांगितल्याप्रमाणे आला, पण एकटाच. त्यामुळे मी नीतूला फोन केला आणि सांगितले की मी यापुढे तुझ्या घरी येणार नाही. तेव्हा काही वेळातच ती माझ्या घरी पोहोचली.
आमचं अपेयपान सुरु होतं. मी खिमा बनविला होता. मला जेवण बनविण्याची आवड आहे आणि असं म्हणेन की अभिनयापेक्षा मी जेवण उत्कृष्ट बनवितो. तर आम्ही खिमा पाव खात होतो तेव्हा चिंटू (ऋषी कपूर चे टोपण नाव) म्हणाला की हे काय खाताय तुम्ही? बरं चल थोडंसं दे मला, असं म्हणत एका पावाच्या तुकड्यासोबत त्याने खिमा खाल्ला. त्याला आवडला असणार म्हणून त्याने सांगितले की, ठीक है, अभी एक कटोरी में दे. असं थोडं थोडं म्हणत त्याने खिम्यासोबत ६ पाव खाल्ले. खिमा पाव खाऊन तृप्त झाल्यावर तो मला म्हणाला की, मैं पैसे लगाता हूँ, तू हॉटेल खोल. ये अॅक्टिंग बिक्टिंग छोड दे और हॉटेल के लिये खाना बना. क्या जबरदस्त कुकिंग करता है तू....ऋषी तोंडानी फटकळ होता परंतु खूप प्रेमळ होता. खूप लवकर गेला तो आम्हा सर्वांना सोडून.', असं नानानं सांगितलं.
हेही वाचा -
२. Sunny Deol : सन देओल धर्मेंद्रसोबत अमेरिकेच्या दौऱ्यावर, पिझ्झा खातानाचा फोटो व्हायरल
३. Jai Ganesha song from Ganpath : टायगर श्रॉफच्या 'गणपथ'मधील जय गणेशा गाणे रिलीज