मुंबई - मराठी चित्रपटात नायिका म्हणून नाव कमावलेली अभिनेत्री दीपाली सय्यद- भोसले सध्या राजकारणात व्यस्त आहे. परंतु तिच्यातील कलाकार नेहमीच जागा असल्यामुळे ती पुन्हा चित्रपटसृष्टीत परतलीय. आता अभिनयाबरोबरच तिने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे. दीपाली "संत मारो सेवालाल" या चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपट संपूर्णतः बंजारा भाषेतील असेल.
संत सेवालाल यांच्या जीवनकार्याचा वेध घेत सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. नुकतेच "संत मारो सेवालाल" या चित्रपटाचे पोस्टर अनावरण राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निर्माती अभिनेत्री दीपाली सय्यद, क्रिएटिव्ह हेड विश्वेश्वर चव्हाण, सेवालाल यांचे पाचवे वंशज महंत जितेंद्र महाराज आणि चित्रपटाचे दिग्दर्शक अरुण राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
माँ भवानी फिल्म आणि स्वामी स्टार आर्ट अँड प्रॉडक्शन निर्मित संत मारो सेवालाल या चित्रपटाची निर्मिती दीपाली भोसले सय्यद आणि फिल्मी सितारा प्रॉडक्शनच्या अशोक तुकारामराव कामले यांनी निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन अरूण मोहन राठोड, जीतेश राठोड यांनी छायांकन आणि बबली हक यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. आशुतोष राठोड यांनी संत सेवालाल यांची प्रमुख भूमिका साकारली आहे.
दुष्काळ, अडचणीत असलेला शेतकरी या समस्या मांडतानाच "संत सेवालाल" यांचा जीवनपट, त्यांचे कार्य, त्यांनी दिलेला संदेश असे या चित्रपटाचं कथानक आहे. बंजारा समाजासाठी महत्त्वाचा असलेला हा चित्रपट संपूर्ण भारतीय प्रेक्षकांनाही विचार देणारा आहे. चित्रपटाचं पोस्टर अतिशय लक्षवेधी आणि संत सेवालाल यांच्याविषयी कुतूहल निर्माण करणारं असून हा चित्रपट नक्कीच लक्षवेधी ठरणार यात शंका नाही.
फिल्मी सितारा प्रॉडक्शनच्या अशोक तुकारामराव कामले यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेला "संत मारो सेवालाल" हा चित्रपट १३ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
हेही वाचा - Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादवचे स्कूटर चालवताना सुटले नियंत्रण, विद्यार्थ्याला दिली धडक