मुंबई - प्रत्येक अभिनेत्याला विविधांगी भूमिका साकारायला आवडतात. मनोरंजनसृष्टीत एखाद्या कलाकाराची एखादी भूमिका प्रसिद्ध झाली की त्याला/तिला त्याच त्याच प्रकारच्या भूमिका ऑफर होतात. त्यातून कलाकार टाईपकास्ट होतो. विनोदी कलाकारांच्या बाबतीत तर हे जास्त प्रमाणात घडत असते. कॉमेडी कलाकार इतर भूमिकांत फिट बसत नाहीत, अशी अनेक निर्माते दिग्दर्शक यांची धारणा झालेली असते. त्यामुळेच चित्रपटातून काम करताना वेगळ्या धाटणीची भूमिका करावी, असा आग्रह विनोदवीर कुशल बद्रिके याचा होता. छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रमात तो वेगवेगळ्या भूमिका करतो परंतु त्या सर्वांचा बेस असतो कॉमेडी. परंतु आता कुशल अतिशय वेगळ्या प्रकारच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. आगामी ऐतिहासिक चित्रपट ‘रावरंभा‘ मध्ये तो नकारात्मक भूमिका साकारतोय. या चित्रपटात तो क्रूरकर्मा कुरबतखान साकारत आहे.
कुशल साकारणार क्रूर कुरबतखान - कुशल बद्रिके त्याचा विनोदाच्या अफलातून टायमिंगसाठी ओळखला जातो. त्याच्या विनोदाने तो प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावतो हे जगजाहीर आहे. परंतु कुशल आता वेगळ्या रूपात भल्याभल्यांना धडकी भरवणार आहे. कुशल बद्रिके ऐतिहासिक चित्रपट आणि नकारात्मक भूमिका पहिल्यांदाच करीत आहे. कुशलने आपल्या भूमिकेबद्दल बोलताना असे सांगितले की, 'मी साकारत असलेला कुरबतखान हा विजापूरचा क्रूर हेर होता. तो शाही सल्तनतला खुश करण्यासाठी कुठल्याही थराला जाणारा आहे. अर्थात तो बहलोलखानचा वफादार सिपाही आहे आणि त्याचे वागणे कोणालाही चीड आणण्यासारखे आहे. अशा प्रकारची भूमिका साकारणं माझ्यातल्या अभिनेत्याला आव्हान होतं. मी या भूमिकेसाठी लुकवर मेहनत घेतली कारण दिसण्यातला वेगळेपणा भूमिकेसाठी महत्वाचा होता. तसेच मी काही लकबी आत्मसात केल्या आणि भूमिका साकारताना त्याचा खुबीने वापर केलाय. मायबाप प्रेक्षक माझ्या या वेगळ्या प्रयत्नाला आपलेसे करतील अशी आशा आणि खात्री आहे.'
रावरंभाची कथा इतिहासातील एक मोरपंखी पान - शशिकांत शीला भाऊसाहेब पवार यांनी ‘रावरंभा’ ची निर्मिती केली असून आणि अनुप जगदाळे यांनी दिग्दर्शनाची धुरा वाहिली आहे. ही प्रेमकहाणी म्हणजे इतिहासातील एक ‘मोरपंखी पान’ आहे असे त्यांचे म्हणणे आहे. अजित भोसले आणि संजय जगदाळे यांनी सहनिर्मिती केली असून महेश भारांबे आणि अन्वय नायकोडी हे कार्यकारी निर्माते आहेत. पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांनी लिहिले असून सिनेमॅटोग्राफी संजय जाधव यांनी केली आहे. फैजल महाडिक यांनी संकलन केले आहे. संगीतकार अमितराज यांनी गीतकार गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांच्या शब्दांना संगीतात बांधले आहे. पार्श्वसंगीत दिले आहे आदित्य बेडेकर यांनी. पौर्णिमा ओक यांनी वेशभूषा, प्रताप बोऱ्हाडे यांनी रंगभूषा आणि वासू पाटील यांनी कलादिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. शेवोलिन मलेश यांनी ऍक्शन दृश्ये दिली आहेत तर जयेश मलकापूरे आणि वॉट स्टुडिओने व्हीएफएक्सची जबाबदारी उचलली आहे. शशिकांत पवार प्रॉडक्शन निर्मित 'रावरंभा' ही ऐतिहासिक चित्रपट येत्या १२ मे ला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.