मुंबई - तापसी पन्नूने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान पटकावलेय. सुरुवातीला दाक्षिणात्य चित्रपटातून चमकलेल्या तापसी पन्नूने डेविड धवन दिग्दर्शित ‘चष्मे बद्दूर’ मधून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. मुल्क, पिंक, बेबी सारख्या चित्रपटांतून तिने तिचे अष्टपैलुत्व सिद्ध केले आणि तिचा मनस्वी भूमिकांसाठी विचार होऊ लागला. बदला, मिशन मंगल, सांड की आँख, थप्पड सारख्या चित्रपटांतून तिने आपल्या नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केले. तिने अभिनयासाठी अनेक अवॉर्ड्स मिळविले असून त्यात फिल्मफेयर बेस्ट ऍक्टरेस चा देखील समावेश आहे. ‘शाबास मिथू’ मध्ये भारताची महिला क्रिकेटची माजी कॅप्टन आणि उत्तम खेळाडू मैथिली राज च्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला असून तापसी पन्नू त्यात मिथाली राजची शीर्षक भूमिका साकारत आहे. आमचे प्रतिनिधी कीर्तीकुमार कदम यांच्याशी खास बातचीत करताना तापसी पन्नूने अनेक गोष्टींचा खुलासा केला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
तू स्पोर्ट्स फिल्म्स कडे धावतेयेस की स्पोर्ट्स फिल्म्स तुझ्याकडे आकर्षित होताहेत? - अगदी खरं आहे. स्पोर्ट्स फिल्म्स माझ्याकडे आकर्षित होताहेत. त्याचं झालं असं आहे की खडतर तयारी कराव्या लागणाऱ्या भूमिका माझ्याकडे येताहेत. नक्की त्या कठीण असल्या तरी तगड्या असतात आणि एक अभिनेत्री म्हणून ती चॅलेंजेस मला घ्यायला आवडतात. या भूमिकांमध्ये रिस्क असते ती घेण्यासाठी इतर उत्सुक नसावेत त्यामुळे कदाचित माझा विचार होतो. मी आधीही स्पोर्ट्स बॅकग्राउंड असलेल्या अनेक चित्रपटांतून काम केलेले असल्यामुळे असेल कदाचित पण अश्या भूमिका मला शोधत येतात ही वस्तुस्थिती आहे. मला स्पोर्ट्सची आवड लहानपणापासूनच आहे. मी अनेक स्पोर्ट्स खेळात आलीय परंतु मी कधीच क्रिकेटची बॅट हातात धरली नव्हती. लहानपणी गल्ली क्रिकेट खेळताना मुलं मला फक्त फिल्डिंग करायला लावायचे त्यामुळे मी पुढे कधी क्रिकेटच्या फंदात पडले नाही. परंतु आता तर मी जगातील नामवंत महिला क्रिकेटर मिथाली राज ची भूमिका करतेय यालाच नियती म्हणत असावेत.
‘शाबास मिथू’ मध्ये कोणत्या प्रकारचे कथानक आहे? - सहसा ‘अंडरडॉग’ कथानक असेल तर ते प्रेक्षकांना भावते. त्यातील कॅरॅक्टर गरिबीतून वर येत, जगाशी लढा देत वगैरे वर आले असेल तर प्रेक्षक त्याला हमखास पाठिंबा देतात. परंतु मिथाली राज चा वैयक्तिक स्ट्रगल फार कमी आहे. किंबहुना या चित्रपटातून महिला क्रिकेट आणि क्रिकेटपटू यांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीबद्दल जास्त बोलण्यात आले असून मिथाली या सर्वांची साक्षीदार आणि ‘टॉर्च बेयरर’ आहे. ‘विमेन इन ब्लू’ ला सन्मानजनक वागणूक मिळावी हा या चित्रपटाचा हेतू आहे. मला यातील तो पॉईंट जास्त भावला आणि जगात, पुरुष आणि महिलांसकट, सर्वात मोठे क्रिकेट करियर असणाऱ्या महिला क्रिकेट खेळाडूची भूमिका मला साकारायला मिळतेय हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.
मिथाली राज बरोबर वेळ घालवला का? तिच्याबद्दल आधी माहित होते का? तिने काही टिप्स दिल्या का? - खरं सांगायचं तर हा चित्रपट बनत असताना मिथाली आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होती. तसेच तो कोविड पिरियड असल्यामुळे ती ‘बबल’ मध्ये असायची. त्यामुळे आमच्या फारशा भेटीगाठी झाल्या नाहीत. तसेच तिने माझ्यासोबत वेळ घालविण्यासाठी रिटायर व्हावे हीदेखील माझी अपेक्षा नव्हती. त्यामुळे मला इतरांची मदत घ्यावी लागली. तिची १० वर्षांपासूनची मैत्रीण आणि महिला क्रिकेटर नुषन कडून मी क्रिकेटचे धडे घेतले आणि मैथिली बद्दल माहिती घेतली. खरंतर हे एकाअर्थी चांगलेच झाले कारण मला मिथाली इतरांच्या नजरेतून कळली. कधीकधी स्वतःमधील बदलांबाबत आपण इतके जागरूक नसतो परंतु आपल्या आसपासची माणसं ते उत्तमरित्या सांगू शकतात. खरं सांगायचं म्हणजे मला मिथाली राज बद्दल काहीच माहिती नव्हते. परंतु एकदा एक पत्रकाराने तिला प्रश्न विचारला की तिचा फेवरीट पुरुष क्रिकेटर कोण आहे? आणि त्यावर तिने दिलेले प्रतिप्रश्न-वजा-उत्तर, ‘तुम्ही पुरुष क्रिकेटर ला कधी विचारलं आहे का की त्याची फेवरीट महिला क्रिकेटर कोण आहे? मिथाली च्या त्या उत्तरात मला एक मानसिक स्थैर्य असणारी उत्तम स्त्री दिसली. अर्थातच मिथाली सोबत संभाषण होत असे आणि त्यातून तिच्या व्यक्तित्वाचे अनेक पैलू सापडत होते.
तू अभिनेत्री असल्याने शारीरिक फिटनेस सांभाळतेस. मानसिक फिटनेस बाबत तुझं काय मत आहे? - मी गेली काही वर्षं निरनिराळ्या भूमिकांसाठी खूप शारीरिक मेहनत करीत आहे. मला जाणवलंय की माझ्या आयुष्यात ट्रेनिंग आणि शूटिंग व्यतिरिक्त काहीच नाहीये. रोज सकाळी दोन-अडीच तास ट्रेनिंग व मग १०-१२ तास शूटिंग आणि घरी आल्यावर सक्तीने लवकर झोपणे. मला ही ‘सायकल’ आता तोडायची आहे कारण त्या सर्वाचा माझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतोय. मला आता स्पोर्ट्स बायोपिक्स मधून ब्रेक घायचा आहे. मला स्वतःला मी खेळाडू किंवा ऍथलिट समजू लागले आहे आणि ऍक्टिंग विसरली की काय ही भावना जागृत होऊ लागलीय. त्यामुळे मी आता माझ्यातील अभिनेत्रीला वाव देणाऱ्या भूमिका साकारायचे ठरविले आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी जर का मला कोणा एक्सपर्ट ची मदत घ्यावी लागली तरी मी कचरणार नाही. जसे शारीरिक आजारपणासाठी डॉक्टर लागतो त्याचप्रमाणे मानसिक आजारासाठीसुद्धा डॉक्टर लागतो आणि मला माझ्यातील कळकळ, भीती, चिंता घालविण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाची मदत लागली तर मी ती बिनदिक्कत घेईन.
लहानपणापासून शाहरुख खानची तू चाहती आहेत. त्याच्यासोबत काम करताना ती ‘चाहती’ डोकावत होती का? - मी शाहरुख सरांची खूप मोठी फॅन आहे. त्यांचा ‘चक दे’ माझा सर्वाधिक आवडता चित्रपट आहे. मी त्यांच्यासोबत दिग्दर्शक राजकुमार हिरानींच्या ‘डंकी’ मध्ये भूमिका करतेय. अर्थातच तो एक गोड माणूस आहे आणि आपल्या सहकलाकारांना कम्फर्टेबल करतो. सुरुवातीला काम करताना माझ्यासाठी ‘फॅन-गर्ल’ मोमेन्ट होता परंतु नंतर मी तो बाजूला सारला आणि एक सहकलाकार म्हणून काम केले. मी त्यांच्या सहवासाने भारावून गेले तर चांगले काम करूच शकणार नाही. मला माहित आहे की ही एकमेवाद्वितीय संधी आहे शाहरुख सरांसोबत काम करण्याची आणि मला ती दवडायची नसून उत्तम काम दर्शवायचे आहे. (हसत) बाकी ‘डंकी’ बद्दल २०२३ च्या डिसेंबर मध्ये बोलू.