बुलडाणा - लोकसभा निवडणुकीसाठी बुलडाणामध्ये सर्वच पक्षाचा प्रचार जोमात आहे. बुलडाणा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार यांच्या मेहकर या बालेकिल्ल्यातच रत्नापुर येथील गावकऱ्यांनी खासदारावर नाराजी दाखवत मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
बुलडाणा मतदार संघ विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांची होम पिच आहे. प्रतापराव जाधव हे मेहकर विधानसभा मतदार संघाचे तीन वेळा आमदार तर दोन वेळा खासदार राहिले आहेत. म्हणजे गेल्या पंचवीस वर्षांपासून ते या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यावेळी पण ते बुलडाणा लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार आहेत. मात्र गेल्या पंचवीस वर्षांपासून याच मतदार संघातील रत्नापुर या गावातील लोकांना अजून मूलभूत सुविधा देखील मिळालेल्या नाहीत. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी प्रतापराव जाधव यांच्यावर नाराजी दाखवत मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
मेहकर तालुक्यातील मोहना खुर्द गट ग्रामपंचायत असलेलं रत्नापुर हे जेमतेम शंभर घरांचं गाव आहे. या गावाची ७०० ते ७५० लोकसंख्या आहे. गावत आदिवासी समुदायाचे लोक राहतात. मात्र, गावात प्राथमिक सोई सुविधा नाहीत. या गावांमध्ये जायला चांगला रस्ता नाही. त्यामुळे गरोदर स्त्रिया किंवा आजारी व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जाणे म्हणजे तारेवरची कसरत होत आहे. पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई आणि नळ योजना नसल्याने खाजगी व्यक्तीच्या शेतातल्या विहिरी वरून दोन किलोमीटर वरून पाणी आणावे लागत आहे. गावामध्ये अंगणवाडी , स्मशानभूमी , घरकुल , शौचालय अश्या कुठल्याच शासकीय योजना अद्यापही मिळालेल्या नाहीत. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा पवित्रा घेतला आहे. याबद्दलचे निवेदनत्यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
एकीकडे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे. तर दुसरीकडे निवेदन देऊनही दहा दिवस झाले तरी या ग्रामस्थांची साधी भेटही कुणी घेतलेली नाही.