नाशिक - शहरात मागील 8 महिन्यात 17 खून, 56 बलात्कार, 62 महिलांचे विनयभंग, 52 चेन स्नॅचिंगसह वाहन चोरी, हाणामाऱ्यांच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कमी झाल्याने गुन्हेगारी वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नाशिक शहरात कोरोनाचे निर्बंध शिथिल होत नाही तोच गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. अध्यात्मिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये मागील आठ महिन्यात 17 खून, 56 बलात्कार, 62 महिलांचे विनयभंग, 52 चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. सणासुदीत गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याने महिलांसह नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
- हेल्मेट मोहीमेबरोबर गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा -
हेही वाचा - दरोडेखोरांनी पळविलेल्या वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
नाशिक शहरात मागील आठ महिन्यापासून खून, बलात्कार, हाणामाऱ्या, चेन स्नॅचिंग, वाहन चोरी, मोबाईल चोरी, विनयभंग आदी घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दुसरीकडे पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यांनी अपघाताच्या घटना लक्षात घेता विना हेल्मेट नागरिकांवर कारवाई सुरू केली आहे. 'नो हेल्मेट नो पेट्रोल' ही मोहीम सुरू करण्यात आली असून, यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. हा उपक्रम जरी कौतुकास्पद असला तरी गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम राबवणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
- तडीपार गुन्हेगारांचा शहरात वावर -
नाशिक शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबादीत राहावी आणि गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी तीनहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना एक आणि दोन वर्षासाठी पोलिसांनी तडीपार केले आहेत. मात्र, यातील अनेक गुन्हेगार पोलिसांची नजर चुकवत शहरात दाखल होत असल्याने गुन्हेगारी वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
- मोक्काची कारवाई -
आनंदवली परिसरात भूमाफियांनी अत्यंत नियोजनबद्ध कट रचून रमेश मंडलिक या 70 वर्षीय वृद्धाची होमगार्डला सुपारी देऊन निर्घृण हत्या केली होती. पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेचा सखोल अभ्यास करत खुनाच्या कटात सामील असलेल्या 19 संशयितांच्या टोळीवर मोक्काची कारवाई केली.
- निर्भया पथकाकडून कारवाई -
महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाकडून धडक कारवाई सुरू आहे. शहरातील ब्लॅकस्पॉट, उद्यान स्थळ आणि चौकात घोळका करून बसणाऱ्या टवाळखोरांना दंडुक्याचा प्रसाद दिला जात आहे. या कारवाईने परिसरातील महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली असून, ही कारवाई अशीच सुरू ठेवावी अशी मागणी महिलांकडून होत आहे. महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी 13 पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्भया पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. या पथकात महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असून, मोबाईल पेट्रोलिंग व्हॅनद्वारे परिसरातील शाळा, कॉलेज, बसस्थानके, बंद पडलेल्या इमारती, उद्याने, मोकळ्या पटांगणात, चौकात गस्त केली जात आहे. अशा ठिकाणी टवाळखोर दिसल्यास त्यांना दंडुक्याच्या प्रसाद दिला जात आहे.
हेही वाचा - दहशतवादी कारवाई प्रकरण : मुंब्रातून आणखी एकास अटक