ठाणे - ऐन गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मित्राच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कल्याण तालुक्यातील म्हारळ गावात घडली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी सात तासांतच आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. संदीप राजू डामले व दिपक राजू डामले, असे आरोपींचे नाव आहे. तर अनिल संजय दुधाडे (२५) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
छातीत व बरगडीजवळ चाकूने भोसकून हत्या -
दिनेश उर्फ बाळा दगडू सुरडकर (२८) याची व आरोपी संदीप राजू डामले यांची काल रात्रीच्या सुमारास मस्करीत शिवीगाळ होऊन हातापायी झाली होती. ती भांडणे पाहून मृत अनिल दूधाडे हा तिथे येऊन त्या दोघांची भांडणे सोडवीत होता. त्याच वेळी संदीपचा भाऊ दिपक राजू डामले हा तिथे आला. त्याने अनिल दुधाडे ह्या आपल्या भावाला मारीत असल्याचा गैरसमज करून त्याने मृत अनिल दुधाडे याच्या छातीत बरगडी जवळ चाकूने भोसकले. त्याला वाचविण्यासाठी दिनेश उर्फ बाळा दगडू सुरडकर जात असताना आरोपी संदीप राजू डामलेयाने त्याला पकडून ठोश्या बुक्याने मारहाण केली. मयत अनिल दूधाडे याच्या मानेवर, डाव्या दंडावर, कंबरेवर गंभीर दुखापत झाल्याने त्याचा यात मृत्यू झाला.
दोन्ही आरोपी भावांना अटक -
याबाबत कल्याण तालुका पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच सात तासांत आरोपीला ताब्यात घेतले. तर दुसरा आरोपी नवीमुंबई येथे पळून गेला होता. त्यालाही लागलीच ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात हजर केले. दरम्यान आरोपींना आज कल्याणच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.
हेही वाचा - महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा - नितेश राणे