ठाणे - धरणाचा तालुका म्हणून शहापूर तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या डोळखांब परिसरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे शहापूरकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
शहापूर तालुक्यात भात पिकासह भाजीपाल्याचे पीक घेऊन शेतकरी कुटुंब उदरनिर्वाह करतात. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. सुमारे तासभर पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मान्सूनच्या पावसाबाबत आशावाद व्यक्त करत आहेत.
गेल्या पाच महिन्यापासून शहापूर तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत एकूण २९ टँकरने गावांसह पाड्यात पाणीपुरवठा केला जात आहे. चांगल्या पावसाचे आगमन झाल्यास पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार होणार आहे. तर पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागतील, असे गुंडे गावातील शेतकरी दयानंद पाटोळे यांनी सांगितले.