मुंबई- सर्वोच न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या सूचनेवरून न्यायदेवतेच्या मूर्तीच्या स्वरूपात बदल करण्यात आलाय. त्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलंय. भारत देशात ऐतिहासिक निर्णय झाला असून, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवलीय. न्यायदेवतेच्या हातात संविधान देऊन डोळ्यांवरील काळी पट्टी काढून न्यायालय आरएसएस आणि भाजपाचा अजेंडा राबवित असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय.
देशात दररोज संविधानाची हत्या : न्यायदेवतेच्या हातातून तराजू काढून संविधान देण्यात आल्याच्या निर्णयावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, न्यायालयाचं काम हे संविधानाचं रक्षण करणं आहे. मात्र महाराष्ट्रात संविधानाच्या विरोधात स्थापन झालेलं सरकार दोन वर्षं असंविधानिकपणे सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयानेही डोळ्यावर पट्टी बांधून घेतलीय. देशात दररोज संविधानाची हत्या होत आहे. न्याय देवतेच्या हातात संविधान देणे म्हणजेच भाजपाची प्रचाराची पद्धत आहे. परंपरेनुसार न्यायदेवतेच्या हातात तराजू आणि डोळ्यांवर पट्टी याचा अर्थ सगळ्यांना समान पाहिलं जातं, मात्र दहा वर्षांत असं घडलं नाही. खरं तर त्याचे बळी आम्ही आहोत. संविधान संपवायचं काम तुम्ही करत असून, न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढून आता उघड्या डोळ्यांनी संविधानाची हत्या आणि भ्रष्टाचार बघा, त्यासाठी पट्टी काढलीय. याचा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने डोळ्यांवर पट्टी बांधून हे सरकार चालवलंय. न्यायदेवतेच्या हातात संविधान देऊन न्यायालय आरएसएसचा अजेंडा चालवित असल्याचा संजय राऊत यांनी म्हटलंय.
न्यायदेवतेच्या हातात आता संविधान: मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना ईडीने 372 कोटींच्या कथित घोटाळ्यातून क्लीनचिट दिलीय, यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, न्यायदेवतेच्या हातात आता संविधान असल्याने अशा प्रकारचे निर्णय घेणे अपेक्षित आहे, असा खोचक टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावलाय. 372 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली नायडूंनी दोन महिने तुरुंगवास भोगला, मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांना मिळालेल्या यशानंतर भाजपाने त्यांना वॉशिंग मशिनमध्ये धुऊन टाकलं आणि क्लीनचिट दिली. मात्र देशातील जनतेने डोळ्यांवर पट्टी बांधलेली नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटलंय.
देशातील जनतेचा ईव्हीएम विश्वास नाही: ईव्हीएमवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचे पुरावे समोर येत आहेत, लोकसभा निवडणुकीच्या वेळीदेखील ते समोर आलं होतं, मात्र सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. देशातील जनतेचा ईव्हीएम विश्वास नाही, जगात ईव्हीएम हद्दपार झालंय. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमला क्लीनचिट दिली हे संविधानाच्या विरोधात असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. तसेच हरियाणा विधानसभा निवडणुकीतदेखील मोठा गडबड घोटाळा झाला असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. जागावाटपासंदर्भातील महाविकास आघाडीची आजची बैठक ही शेवटची बैठक असू शकते, कारण आज जागावाटपाची चर्चा संपवावी लागणार आहे, असंही ते म्हणालेत.
इतर समाजाने मतदान करायचं नाही का?: व्होट जिहाद शब्द कायद्याच्या चौकटीत बसतो की नाही हे निवडणूक आयोग तपासणार आहे, यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, हे तपासण्यासाठी फार काळ लागणार नाही, त्यासाठी तुम्ही किती वेळात तपासणार त्याची कालमर्यादा ठरवा, त्याला तुम्ही जात आणि धर्माचा रंग देत आहात. देशात मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, पारशी समाजाने मतदान करायचं नाही का? हा वोट जिहाद होतो का? किरण रिजिजू सरळ सरळ सांगतात की, भाजपाला मतदान करा, तुम्हाला मंत्रिपद देऊ हा वोट जिहाद नाही का? असा सवालही संजय राऊतांनी विचारलाय. टोलमाफी आणि लाडकी बहीण योजना दोन वर्षांपूर्वी का आली नाही, निवडणुकीच्या तोंडावर का आणली हा प्रकार देखील वोट जिहादच असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. तसेच लहान भाऊ आणि मोठा भाऊ हे आमच्या तिघांच्या डोक्यात नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.
एका पक्षात दोन मुख्यमंत्री होत नाहीत: जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदार देण्याचे संकेत शरद पवारांकडून दिले जात असल्याचे समोर येत आहे, यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की अशा प्रकारचे संकेत शरद पवार कधी देत नाहीत, तसे असते तर त्याबाबत आम्ही चर्चा करू, मधल्या काळात रोहित पवार यांच्यावरदेखील मोठी जबाबदारी देण्याची घोषणा केली होती. एका पक्षात दोन मुख्यमंत्री होत नाहीत, मध्यला काळात सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांचे नावे चर्चिले जात होते, त्यामुळे एका पक्षात चार-पाच मुख्यमंत्री कसे असू शकतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
रविवारी पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता - वडेट्टीवार : जागावाटपाच्या संदर्भात महाविकास आघाडीची शेवटची बैठक आहे. सर्व जागांवरील तोडगा निघून 20 तारखेला पहिली यादी जाहीर होऊ शकते, असा अंदाज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय. जागा वाटपासंदर्भात आज किंवा उद्या महाविकास आघाडीचा संयुक्त पत्रकार होऊ शकते. महाविकास आघाडी राज्यातील 8 विभागात किमान तीन सभा व्हाव्यात, अशा प्रकारचे नियोजन आम्ही केलंय. समाजवादी पक्षाला देखील काही जागा सोडण्याचा निर्णय झाला असून, यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेऊ, असेदेखील त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा :