ठाणे - नव्या कृषी कायद्याविरोधातील देशव्यापी आंदोलनात सिटू संघटनाही सहभागी झाली आहे. संघटनेने दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटले असून भिवंडी सिटू संघटनेच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली आहे.
तहसीलदार कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त
भिवंडी शहरातील तहसीलदार कार्यालयासमोर भिवंडी 'सीटू'च्या वतीने पॉवरलूम व विडी कामगार, शेतमजुरांना सोबत घेऊन दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कॉम्रेड सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी भिवंडी तहसीलदार अधिक पाटील यांना केंद्र सरकारविरोधात निवेदन देऊन मोदी सरकाच्या नव्या कृषी कायद्याला विरोध असल्याचे नमूद केले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून तहसीलदार कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.