ठाणे - भिवंडी शहरातील अग्नितांडवांच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. यंत्रमाग कारखाना अथवा गोदामांना आगी लागल्याच्या घटना भिवंडीत वारंवार घडत आहेत. आज (शुक्रवार) भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीमधील तरे कंपाऊंड येथील यंत्रमाग कारखाना असलेल्या दोन मजली इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला आहे.
आगीचे कारण अजूनही अस्पष्ट-
भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीमधील तरे कंपाऊंड याठिकाणी इमारतीच्या तळ मजल्यावर यंत्रमाग कारखाना आहे. कारखान्याच्या वरील मजल्यावर कपड्याचे गोदाम होते. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तयार कपडा साठविण्यात आला होता. त्याच गोदामाला सकाळच्या सुमारास अचानक आग लागून ती क्षणार्थत भडकली. या घटनेची महिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तीन तासात या आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठी वित्त हानी टळली. मात्र या आगीत संपर्ण कारखान्यासह कपड्याचे गोदाम जळून खाक झाले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही.
भिवंडीत भीषण आगीच्या घटनांचं सत्र सुरूच-
भिवंडीत आगिचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी सात भंगार गोदामांना लागलेली आग विझते न विझते तोच आमने गावात असलेल्या गोदाम संकुलनातील दोन कंपन्यांना बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. तालुक्यातील आमने गावच्या हद्दीत असलेल्या महावीर गोदाम संकुलनात व्हीआरआयपीएल रिटेल कंपनी व ऑर्बीट एक्स्पोर्ट कंपनी या दोन गोदाम कंपन्यांना पहाटे भीषण आग लागली असल्याने लागलेल्या आगीत दोन्ही कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. या गोदाम कंपन्यांमध्ये प्लास्टिक, कासमैटीक, घरगुती साहित्य, हार्डवेअर तसेच कापडाचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आला होता.
आगीच्या घटनांची सखोल चौकशीची मागणी-
मार्च महिना आला की भिवंडीत गोदाम व यंत्रमाग तसेच डाइंग सायजिंग कंपन्यांना आग लागण्याचे सत्र सुरू होते. या आगीमागील नेमकं कारण समजत नाही. त्यामुळे आग अचानक लागतात की इन्शुरन्स मिळविण्यासाठी लावल्या जातात. याबाबतचे सत्य समोर येतांना दिसत नाही. त्यामुळे या आगीच्या घटनांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
हेही वाचा- सरकारने खुशाल चौकशी करावी, आम्ही पुरावे न्यायालयात सादर करू - फडणवीस