ठाणे - कॅन्सर रोगावरील औषधांची नक्कल करून बनावट इंजेक्शन व गोळ्या मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे कल्याणमधील प्राइम फार्मा कंपीनीत कॅन्सर रोगावरील बनावट औषधे तयार केली जात होती. याप्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे विभागाने कंपनीवर छापेमारी करून बनावट औषधांचा लाखोंचा साठा जप्त करून कंपनीतुन एका ३१ वर्षीय महिलेला अटक केली आहे. पूजा राणा असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून ती डी फार्मेसी असल्याचे समोर आले आहे.
नामांकिक कंपनीच्या नावाचा गैरवापर -
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जपानच्या ओशाका फार्माक्यूटील कंपनीच्या नावाचा गैरवापर करून या औषधाची विक्री सुरु होती. मात्र हि गंभीर बाब कंपनीला समजताच, त्यांनी मुंबई गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला.
बनावट ग्राहक पाठविल्याने उघडकीस आली घटना -
विभागाचे पोलीस उपनिरीक्षक नितिन पाटिल यांनी तपास सुरु करून मार्च महिन्यात या पथकाने कल्याणातील प्राइम फार्मामध्ये बनावट ग्राहक पाठवून कँसर रोगावरील एडसेट्रिस इंजेक्शन खरेदी केले. ज्याची किमंत पाच लाख रुपये असून हे इंजेक्शन १ लाख १२ हजार रुपयात विक्री केले. त्यांनतर पथकाने तपास केला असता, इंजेक्शन बनावट असल्याचे समोर आले.
६७ लाख ९० हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त -
छापेमारी नंतर कंपनीतून इंजेक्शनचे ७ बॉटल ज्याची प्रत्येकी किंमत ५ लाख ८० हजार आणि गोळ्यांचे २ बॉक्स ज्यांची प्रत्येकी किंमत १३ लाख ५० हजार आणि १ लॅपटॉप, १ मोबाईल असे एकूण ६७ लाख ९० हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अन्य आरोपींचा शोध सुरु -
कॅन्सर सारख्या जीवघेण्या रोगावर महागडे बनावट औषधे विक्री होत असल्याचे समोर आल्याने बनावट औषधे घेणाऱ्या रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर पोलिसांनी पूजा राणा यांच्या विरोधात भादंवि कलम 420, 336, 483, 486 आणि 34 प्रमाणे तसेच कॉपी राइट आणि ट्रेडमार्क 1957 कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केलेल्या महिलेच्या साथीदारांचा शोध पथकाने सुरु केला आहे.