ठाणे - भारतीय सैन्य दलात पंजाबच्या जालंधर येथे कर्तव्य बजावनाता जवान मिलिंद नामदेव ठुंबरे (37) यांना वीरमरण आले. या जवानाचे पार्थिव डोंबिवली जवळच्या खंबाळपाड्यातल्या शंखेश्वर पार्क येथे राहत्या घरी आणण्यात आले. सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी सलामी दिल्यानंतर या जवानाचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सोसायटीच्या आवारात ठेवण्यात आले होते. यानंतर पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
ठाकुर्ली जवळच्या खंबाळपाड्यातल्या शंखेश्वर पार्क या सोसायटीत राहणारे ज्येष्ठ सदस्य नामदेव ठुंबरे यांचे सुपुत्र मिलिंद ठुंबरे यांना मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास भारतीय लष्करात सेवा बजावताना वीरमरण आले. पंजाबमधल्या जालंधर येथे जवानांची परेड सुरू असताना मिलिंद ठुंबरे हे अचानक चक्कर येऊन कोसळले. लगेच त्यांना पंजाबमधील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यानंतर त्यांचे पार्थिव अमृतसरहून मुंबईत विमानाने आणले. मुंबई विमानतळावर त्यांना लष्करी अधिकाऱ्यांनी सलामी दिली.
गुरुवारी सकाळी त्यांचे पार्थिव शंखेश्वर पार्क येथे राहत्या घरी आणण्यात आले. यावेळी मिलिंद यांची 65 वर्षीय आई सत्यवती आणि 72 वर्षीय वडील नामदेव यांनी आक्रोश केला. पत्नी मानसी हिने तर पतीचे पार्थिव पाहून हंबरडाच फोडला. यावेळी 7 वर्षीय दिव्या आणि 3 वर्षीय स्वरा या त्यांच्या निरागस चिमुरड्यांनाही पित्याचे अंत्यदर्शन घेताना शोक अनावर झाला होता. यावेळी विद्या निकेतन संस्थेचे संस्थापक विवेक पंडित, स्थानिक आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासह नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे फिजिकल डिस्टन्स ठेऊन उपस्थित नागरिकांनी साश्रुनयनांनी वीरपुत्राला अखेरचा निरोप दिला. तर लष्कराचे नायब सुभेदार अखिलेश चौधरी आणि जवान भगवान शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात पाथर्लीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. यावेळी चोळगाव, ठाकुर्ली, खंबाळपाडा, डोंबिवलीतील असंख्य नागरिक उपस्थित होते.