ठाणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंगे काढण्या संदर्भात केलेल्या विधानाचा वाद शांत होण्याची चिन्ह दिसत नाहीत. या वादात आता रिपब्लिकन बहुजन सेनेने उडी घेतल्याने वाद आणखी चिघळेल, असे लक्षण दिसत आहेत. शनिवारी (दि. 2 एप्रिल) ठाण्यात होऊ घातलेल्या राज ठाकरेयांच्या सभेला रिपब्लिकन बहुजन सेनेतर्फे विरोध केला जाईल, अशी माहिती आज ( दि. 7 एप्रिल ) राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे यांनी दिली. मुलुंड चेक नाका ते गडकरी रंगायतन येथील सभा स्थानापर्यंत आपल्या पक्षाचे कार्यकर्ते उभे राहून राज ठाकरे यांचा मूक निषेध करतील व त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवतील, असा इशारा केल्याने हा संघर्ष आणखी पेटेल, अशी चिन्हे दिसत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( Maharashtra Navnirman Sena ) हा राजकीय पक्ष नसून तो गुंडांचा पक्ष असल्याने केवळ हिंदू मुसलमान दंगली घडविण्याचा कट करत असल्याचा गंभीर आरोप विजय घाटे यांनी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विरोधात मनसेचे कार्यकर्ते कार्य करत आहेत. शनिवारी (दि. 9 एप्रिल) होणाऱ्या राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला परवानगी देऊ नये, असे पत्र त्यांनी आज पोलीस आयुक्तांना दिले. हिंमत असेल तर राज ठाकरे यांनी मुंब्र्यात सभा घेऊन दाखवावी, मैदान आम्ही मिळवून देतो, असे आवाहन विजय घाटे यांनी केले. विजय घाटे यांच्या या विधानानंतर आता ठाण्यातील राजकीय परिस्थिती आणखी चिघळण्याची लक्षणे दिसत असून यावर पोलीस आयुक्त काय पाऊल उचलतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - Raj Thackeray Sabha Thane : येत्या 9 एप्रिलला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार!