ठाणे - सध्या बाजारात तोंडावर लावण्यात येणाऱ्या मास्कची मोठ्या प्रमाणात कमतरता भासते. पण यावेळी सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन ठाणे मध्यवर्ती कारागृहामधील शिवणकाम विभागातील 15 कैद्यांनी सुमारे चार हजार मास्क मागील चार दिवसात तयार केले आहेत. येथील कैदी हे या कारागृहात राबवल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या सहा उद्योग कारखान्यात काम करतात. पण, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून सुरक्षेच्या उपाययोजना करत कारागृहातील सर्व कामे सुरूच ठेवली होती. ज्यामध्ये शिवणकाम, फर्निचर, बेकरी आणि लूमचा समावेश आहे.
ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये आजच्याघडीला विविध प्रकारच्या गुन्ह्यात अटक झालेले अडीच हजाराच्यावर कैदी आहेत. यात विविध गुन्ह्यात शिक्षा झालेले प्रत्येकी शंभर कैदी सुतारकाम, शिवणकाम, धोबीकाम, यंत्रमाग, बेकरी, फरसाण तयार आदी कामांचे प्रशिक्षण दिले जात होते. त्यानंतर त्यांना या कारागृहात असलेल्या विविध उद्योग कारखान्यात त्यांना रोजगार दिला जातो. याकरिता त्यांचे तीन गट केले आहेत. त्यात कुशल, अर्धकुशल आणि अकुशल असे तीन गट करण्यात आले आहेत. त्यात कुशल गटातील केद्याना प्रतिदिन ५५ रुपये, अर्धकुशल ५० आणि अकुशल गटातील केद्याना ४० रुपये दिले जातात. एकंदरीत ज्या व्यक्तींनी त्यांच्या पूर्वआयुष्यात केलेल्या काही चुकीच्या कृत्यापायी त्यांना न्यायाल्याने शिक्षा दिली. त्यानंतर या कारागृहात त्यांची रवानगी झाली. येथे येवून त्यांनी विविध उद्योगांचे प्रशिक्षण घेवून याच शासनालाच करोडो रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. आजच्याघडीला राज्यात कोरोना व्हायरसची मोठी दहशत पसरली आहे. त्यामुळे मास्कची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासत आहे.
हाच मुद्दा लक्षात घेऊन ठाणे मध्यवर्ती तुरुंग प्रशासनाने त्यांच्या शिवणकाम विभागात त्वरित मास्क बनवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या विभागात काम करणाऱ्या पंधरा कैद्यांनी मागील चार महिन्यात हजारो मास्क बनवून त्याचा पुरवठा आर्थर रोड कारागृह, कल्याण कारागृह आणि ठाणे कारागृहमध्ये केला. जवळपास 10 हजार मास्क कारागृहात बनवण्यात आले आणि आता शासनाकडून जशी या मास्कची मागणी करण्यात येईल तसा येथून पुरवठा करण्यात येणार आहे. याशिवाय सिव्हील रुग्णालय आणि मनोरुग्णालयाला कपडे देण्याचे कामही कारागृहातून होत आहे. याशिवाय लीलावती रुग्णालय आणि काही समाजसेवी संस्थांना मास्क पुरवठा करण्यात आला आहे .संपूर्ण लॉकडाऊनमध्ये कारागृहाच्या बेकरीने सिव्हील रुग्णालय आणि मेंटल हॉस्पिटलला ब्रेड बिस्किटे, पाव आणि नानकटाई पुरवले आहेत.
कारागृहात लूमही सुरू
ठाणे कारागृहात स्वतःची लूम आहे, ज्यात ते आवश्यक असलेले सर्व कापड बनवतात आणि त्याचा उपयोग आवश्यक कामासाठी करतात. शिवाय कारागृहात कैद्यांकडून सुतारकामदेखील केले जात आहे, ज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरळी गेस्ट हाऊसचे फर्निचर बनवले जात आहे. सोबत काही न्यायालयाला लागणारे फर्निचरदेखील बनवण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारे संकटाच्या काळात याप्रकारे तत्परतेने हें मास्क तयार करून ठाणे मध्यवर्ती कारागृहातील या कैद्यांनी समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. या शिक्षा झालेल्या कैद्यांमध्ये कोणी खुनातील, बलात्कार, चोरी, दरोडे आदी गुन्ह्यामध्ये शिक्षा झालेले आरोपी आहेत. याशिवाय कारागृह प्रशासन आपली आणि कैद्यांची काळजी घेत असून, बाहेरच्या लोकांशी संपर्क पूर्ण बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे कारागृहात एकही जण कोरोनाबाधित नाही.