ठाणे - अंबरनाथमधील एमआयडीसीला लागूनच चोरी-छुप्या पद्धती सुरु असलेल्या पाच जीन्स वॉश कारखान्यांवर अंबरनाथ नगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी करीत कारखाने सील केले आहेत. खळबळजनक बाब म्हणजे राजकीय आश्रयातूनच हे बेकायदा कारखाने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
68 कंपन्यांना बजावल्या नोटिसा -
काही दिवसांपासून अंबरनाथ व उल्हासनगरमधून वाहणाऱ्या वालधुनी नदीत रासायनिक पाण्यातून उद्भवणारे जल आणि वायू प्रदूषणाच्या मुद्यामुळे एमपीसीबीकडून आनंदनगर एमआयडीसीतील कंपन्यांची झाडाझडती सुरू होती. गेल्या दोन महिन्यांत जवळपास 68 कंपन्यांना एमपीसीबीने नोटिसा बजावल्या होत्या. या घटनेनंतर वालधुनीच्या पात्रात उग्र दर्प असलेले रसायन सोडल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले होते. रासायनिक कंपन्या आणि रसायन सोडणाऱ्या टँकर लॉबी एमपीसीबी आणि प्रशासकीय यंत्रणांना घाबरत नसल्याचे समोर आले होते.
दोन वर्षांपासून जीन्स वॉश कारखान्यांना बंदी -
एकीकडे रासायनिक कंपन्या जल प्रदूषण करत असताना दुसरीकडे गेल्या दोन वर्षांपासून न्यायालयाच्या आदेशाने राज्य सरकारने ठाणे जिल्ह्यातील जीन्स वॉश कारखान्यावर बंदी घातली आहे. दोन वर्षांपूर्वीच उल्हासनगर शहरातील 400 जीन्स वॉश कारखान्यावर कारवाई करून त्यांना कायम स्वरूपी बंद केले. मात्र, हेच कारखानदार भिवंडी, कल्याण अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात चोरीछुप्पे कारखाने सुरु करून प्रदूषण करीत असल्याचे अनेकदा प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईवेळी समोर आले आहे.
वालधुनी नदी आणि नाल्यांमध्ये सोडले जात सांडपाणी -
आजही अंबरनाथ उल्हासनगरच्या काही भागात बिनधास्त कारखाने सुरू असून, जीन्स वॉशचे पाणी थेट वालधुनी नदी आणि नाल्यांमध्ये सोडले जात आहेत. पर्यावरण सचिवांनी अंबरनाथमधील प्रदूषणाची पाहणी केल्यानंतर नगरपालिका हद्दीतील जीन्स वॉश कारखाने शोधून काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या आदेशानंतर उपमुख्याधिकारी धीरल चव्हाण, नरेंद्र संखे तसेच पालिका कर्मचारी आणि एमपीसीबीच्या कर्मचाऱ्यांनी अंबरनाथ येथील लोकनगरी, शिवाजीनगर, एमआयडीसी रोड, पेट्रोल पंपजवळ आणि दीपक नगरसह पाच ठिकाणी छुप्या पद्धतीने विनापरवाना सुरू असलेल्या जीन्स वॉश कारखान्यांवर छापा टाकत कारवाई केली आहे.