ठाणे - डान्सबारमधील बारबालांवर पैश्यांची उधळण करण्यासाठी एका राजस्थानी व्यक्तीने रेल्वे प्रवाशांना लुटमारीचा मार्ग निवडल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे रेल्वे प्रवासादरम्यान ओळख वाढून त्या प्रवाशांना कोल्डड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध करून त्यांना लुटत असल्याचा खळबळजनक प्रकार कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या तपासात समोर आला असून त्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
अफीमचेही व्यसन
गोविंदराम चौधरी असे आरोपीचे नाव असून त्याला अफीमचेही व्यसन लागले असून त्याने आतापर्यंत अनेक प्रवाशांना लुटल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.
आरोपीला घेतले वडोदरा रेल्वे पोलिसांच्या ताब्यातून
कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुंगीचे औषध देत एका प्रवाशाला लुबाडण्याबाबत तक्रार दाखल काही दिवसांपूर्वी दाखल झाली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्याण लोहमार्ग पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांच्या तपासादरम्यान गुजरातमधील वडोदरा रेल्वे पोलिसांकडून अशाच गुन्ह्यात एका आरोपीला अटक केल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिसांना मिळाली. त्यांनतर कल्याण रेल्वे पोलिसांनी तत्काळ वडोदरा रेल्वे पोलिसांकडून आरोपी गोविंदराम याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता पोलिसांनी त्याच्याकडून रेल्वे प्रवासादरम्यान लुटमारी केलेले महागडे सोन्याचे ब्रेसलेट राजस्थानहून हस्तगत केले आहे.
गुंगीचे औषध देऊन लुटायचा
आरोपी गोविंदरामला डान्सबारमध्ये जाऊन बारबालांवर पैसे उधळण्यासह आफीमचे व्यसन आहे. याच गरजा भागवण्यासाठी ट्रेनमधील प्रवाशांच्या विविध खाण्याच्या व पिण्याच्या पदार्थामध्ये गुंगीचे औषध देऊन तो प्रवाशांना लुटत होता.