ठाणे - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्यादिवशी मशिदीवरील भोंगे (Masjid Loudspeakers) उतरवा, अन्यथा आम्हीदेखील भोंगे लावून हनुमान चालीसा लावू, असा इशारा दिला होता. त्याचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. मुंब्रा येथे मनसे विरुद्ध राष्ट्रवादी (MNS Vs NCP in Mumbra) असा थेट सामना होण्याची लक्षणे दिसत आहेत. मुंब्र्यातील मनसे कार्यालयावर (MNS Office Mumbra) असलेला बोर्ड आज रात्री बारा वाजेपर्यंत हटवा, अन्यथा राष्ट्रवादी स्टाईलने तो हटवण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मनसेला दिला आहे.
पक्षाचा बोर्ड हटवणार नाही - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या विधानावरून मुस्लिम समाजात प्रचंड रोष आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर गृहनिर्माण मंत्री तथा मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील तिखट प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे मुंब्रा कौसा येथील चिडलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तंवर नगर येथे मनसे कार्यालयावर असलेले मनसे पक्षाचे बोर्ड हटवण्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत वेळ दिला आहे. रात्री बारा वाजेपर्यंत बोर्ड काढून टाका, अन्यथा राष्ट्रवादी स्टाईलने बोर्ड काढण्यात येईल, असा धमकीवजा इशारा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे. वाहतूक शाखेचे अध्यक्ष व मनसे नेते इरफान सय्यद यांनी पक्षाचा बोर्ड हटवणार नसून, आपण पोलिसांना याबाबतची माहिती दिली असल्याचे सांगितले. आपण मनसेतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली असून, त्यांनी देखील आपल्याला आश्वस्त केले असल्याचे इरफान सय्यद म्हणाले.
रात्री 12 पर्यंत बोर्ड काढा - राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बबलू यांनी मात्र रात्री बारा वाजेपर्यंत बोर्ड न हटवल्यास तो आपण आपल्या पद्धतीने हटवू, असा इशारा दिला आहे. राज ठाकरे हे आपल्या वक्तव्याने हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करत असून, आपण त्यांचा हा हेतू कधीच साध्य होऊ देणार नाही, असे अयाज बबलू यांनी सांगितले. सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र असा रमजान महिना सुरु आहे. त्यातच हा वाद झाल्याने मुंब्र्यातील राजकारण तापले आहे.