नवी मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी नवी मुंबईतील वाशीच्या माथाडी भवन मध्ये गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे खासदार नारायण राणे, आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत ही गोलमेज परिषद पार पडली.
मराठा आरक्षण मिळवून देणारच -
गेल्या कित्येक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी भांडत आहे. सर्व मराठा संघटनांनी एकत्र यावे, आंदोलन छेडावे, असे नारायण राणे म्हणाले. आता मूक मोर्चा काढून फायदा नाही, ही लढाई थेट मैदानात आणि उद्धव ठाकरेंच्या दालनात लढायची आहे, अशी टीका राणे यांनी केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्य 10 वर्ष मागे गेले आहे, असेही राणे यांनी म्हटले. 'एकच निर्धार' मराठा आरक्षण मिळवून देणारच' असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले. तसेच नाना पटोले यांना अभ्यास करून या, असा टोलाही लगावला.
वादविवादासाठी राज्य सरकारने एका व्यासपीठावर यावे -
मराठा आरक्षण रद्द होण्यासाठी कोण जबाबदार आहे, हे सिद्ध करण्यासाठी राज्य सरकारने वादविवादासाठी एका व्यासपीठावर यावे असे वक्तव्य विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केले.
रामदास आठवले यांनी सादर केली कविता -
केंद्र सरकारला फक्त मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे केंद्र सरकार देशातील सर्व क्षत्रिय समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. तसेच "मी लढा देणार मराठा आरक्षणासाठी, मी आहे जिवंत घाटी, हातात घेऊन लाठी, मी लागणार उद्धव ठाकरेंच्या पाठी, मराठा समाजाला मिळत नाही आरक्षण, उद्धव ठाकरे यांचं दिसत नाही ठीक लक्षण, जर एकत्र आले मराठा दलित तर मराठा समाजाला मिळेल फलित, जर मराठा झाला जागा तर उद्धव ठाकरेंच्या होतील उध्वस्त बागा," ही कविता सादर केली.