ठाणे - दिवा परिसरातील मुब्रादेवी कॉलनीत अनधिकृत वीज वापरणाऱ्यांवर शुक्रवारी धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये दिवा मुंब्रादेवी परिसरातील विविध नऊ इमारती मधील ३३६ ग्राहकांचा अनधिकृत वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तर, गुरुवारी करण्यात आलेल्या कारवाईत इमारतीच्या भरत पाटील व राकेश पाटील या बिल्डरांवर मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईत इमारतींच्या बिल्डरांवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम-पाटील यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली.
दिवा परिसरात वांरवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. त्यात विविध इमारतींत अनधिकृत वीज पुरवठा घेतला गेल्याचे लक्षात आले. यामुळे ट्रान्सफॉर्मरवर विजेचा भार वाढल्याने प्रामाणिक ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होण्याच्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. यामध्ये गुरुवारी एका इमारतीवर तर शुक्रवारी आठ इमारतींवर कारवाई करण्यात आली. या इमारतींमधील ३३६ फ्लॅट/गाळ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. यामध्ये मनस्विनी इमारतीत ३०, जगन्नाथ धाम इमारतीत ६३ , क्रिश प्लाझा इमारतीत ३२, शंकर निवास इमारतीत ५७, मोरेश्वर गॅलेक्सी इमारतीत ३१, यशरुद्र १९, अर्जुन रेसिडेन्सी इमारतीत ७० व साई सावली इमारतीत दोन अनिधकृत कनेक्शन आढळून आले. तर गुरुवारी कारवाई करण्यात आलेल्या जगन्नाथ धाम ई एफ इमारतीतील ३२ फ्लॅट/गाळे धारकांचा पुरवठा खंडित करून बिल्डरवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काही ग्राहकांनी नवीन जोडणी करता फक्त अर्ज केला असून त्यांच्या वीज जोडणीबाबत करवाई करण्यात येत आहे. या अनधिकृत जोडण्यांमुळे महावितरणच्या कोट्यवधी रुपयांचा महासुलावर परिणाम होत आहे.
"अनधिकृत वीज चोरी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. जे अनधिकृत वीज जोडणी धारक/बिल्डर यामध्ये दिसून येतील त्यांच्यावर गुन्हे नोंद करून कारवाई करण्यात येईल. तसेच अनधिकृत वीज वापराची रक्कम वसूल करण्यात येईल. शिवाय शासनाच्या इतर संबंधित विभागांना याबाबतची माहिती देऊन त्यांना त्यांच्या कायद्याच्या तरतुदी अंतर्गत तपासणी करण्यासाठी कळवण्यात येईल." असा स्पष्ट इशारा काळम-पाटील यांनी दिला आहे.