ठाणे - सहा महिने उलटूनही परतावा न मिळाल्याने हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांनी मनसेकडे धाव घेऊन तक्रारी दाखल केल्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत मनसेने गुरुवारी (आज) संबंधित डोंबिवलीतील एका सराफाला घेराव घातला. त्यांनतर मात्र गुंतवणूकदार आणि मनसेच्या आक्रमक पावित्र्याने सदर ज्वेलर्स मालकाने नरमाईची भूमिका घेतली आणि गुंतवणूकदारांच्या रकमा परत करण्यासाठी मुदत मागवून घेतली.
आठ-दहा महिन्यांपासून परतावा नाही
यापूर्वी डोंबिवलीत काही वर्षांपूर्वी गुडविन ज्वेलर्स व प्रथमेश ज्वेलर्सने गुंतवणूकदारांना लाखोंचा गंडा घातला होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. त्या पाठोपाठ आता डोंबिवली पूर्वेकडील डॉ. राजेंद्र प्रसाद रोडला असलेल्या व्ही. जी. एन. ज्वेलर्सनेदेखील गेल्या आठ-दहा महिन्यांपासून परतावा न दिल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. गुंतवणूकदारांनी व्ही. जी. एन ज्वेलर्सकडे परताव्यासाठी तगादा लावला. मात्र वारंवार उंबरठे झिजवूनदेखील दिलेल्या तारखांना पैसे मिळाले नाहीत. या संदर्भात संबंधित त्रस्त गुंतवणूकदारांनी मनसेकडे धाव घेऊन गाऱ्हाणे मांडले. गुरुवारी मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत, जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, ज्येष्ठ नेते तथा संघटक प्रल्हाद म्हात्रे, संदीप उर्फ रमा म्हात्रे, दीपिका पेडणेकर, रवी गरूड, राहुल चितळे, सुमेधा थत्ते, प्रतिभा पाटील, प्रितेश म्हामूणकर, आदी पदाधिकारी व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांसह गुंतवणूकदारांनी थेट व्ही. जी. एन. ज्वेलर्सचे दुकान गाठले. या साऱ्यांनी पेढीचे मालक व्ही. जी. नायर यांना जाब विचारत गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची मागणी केली.
'डिसेंबरपर्यंत वेळ द्या, तुमचे पैसै बुडवणार नाही'
व्ही. जी. एन ज्वेलर्सच्या मॅनेजमेंटची मनसे पदाधिकारी व गुंतवणूकदारांसमवेत बैठक झाली. या बैठकीत ज्वेलर्सचे मालक व्ही. जी. नायर यांनी स्पष्टीकरणासह आश्वासन दिले. एवढी वर्ष माझ्यावर विश्वास ठेवला, तसाच विश्वास कायम ठेवा. मला डिसेंबरपर्यंत वेळ द्या, मी तुमचे पैसै बुडवणार नाही. आम्ही कुणाची फसवणूक करणार नाही. लॉकडाऊनमुळे साऱ्यांवर आर्थिक संकट आहेच. मात्र डिसेंबरपर्यंत सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत करू, असेही आश्वसन नायर यांनी दिले. दिलेल्या मुदतीत पैसे करत करा, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल, असाही इशारा शहराध्यक्ष मनोज घरत यांनी यावेळी दिला.
आंदोलनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त
या ज्वेलर्सच्या दुकानासमोर गेल्या सात-आठ महिन्यांपासून गुंतवणूकदार मंडळी परतावा मिळविण्यासाठी फेऱ्या मारत आहेत. मात्र ज्वेलर्सकडून धाक-धमक्यांव्यतिरिक्त काहीही मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी मनसेची मदत मागितली. मनसेने गुंतवणूकदारांच्या लेखी तक्रारी नोंदविल्यानंतर आंदोलनाचा पावित्रा घेतला. आंदोलनस्थळी कायदा, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोणताही अनुचित प्रकार घडून सदर ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.