ठाणे - कोरोना काळातील दोन वर्षाच्या सावटानंतर आता दहीहांडी उत्सव साजरा होणार आहे. त्यानुसार यंदाची संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाऊंडेशन यांच्या वतीने साजरा होणारा प्रो गोविंदा उत्सव हा हिंदुत्ववादी दहीहंडी उत्सव असेल, अशी ग्वाही आमदार प्रताप सरनाईक ( MLA Pratap Sarnaik ) यांनी दिली. ही हंडी फोडण्याचा रेकॉर्ड झाला आहे. हा रेकॉर्ड 9 थरांचा आहे. यावर्षी हा रेकॉर्ड मोडल्यास 21 लाखांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले आहे. दहीहंडी उत्सवापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या उत्सवाचा क्रिडा प्रकारात समावेश करण्याचा निर्णय अंतिम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.या उत्सवाचा त्यात समावेश झाला तर यात सहभागी होणाऱ्या तरुणांना नोकरीच्या ठिकाणी देखील त्याचा फायदा होऊ शकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यासंबंधी केलेली मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्य करत त्याबाबतचा निर्णय जाहीर केला. स्पेन देशात मानवी मनोरे रचने हा खेळ खेळला जातो आणि त्यांचे खेळाडू जगभर त्यासाठी फिरतात. स्पेन पेक्षा चांगले मानवी मनोरे आपले गोविंदा पथके रचतात. त्यामुळेच त्यांना क्रीडा प्रकारात अधिकृत समावेश करुन खेळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी गेले अनेक वर्षे करीत आहे. त्याबाबतचा निर्णयही मुख्यमंत्री शिंदे हे घेतील, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. आनंद दिघे यांनी ठाण्यात हिंदू उत्सव अधिक भव्य प्रमाणात साजरे करण्यास सुरुवात केली. दिघे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही टेंभी नाका येथे दहीहंडी उत्सव सुरुच ठेवला. आमच्या सारखेच तेही दहीहंडी उत्सव आयोजित करतात. त्यामुळे पुढील वर्षाच्या आत दहीहंडीचा समावेश क्रीडा प्रकारात झालेला असेल, असे सरनाईक यांनी सांगितले.
अधिकृत क्रीडा प्रकार म्हणून दहिहंडीला मान्यता मिळाल्यानंतर गोविंदा जगभर जाऊ शकतात, भविष्यात दहीहंडीचा समावेश ऑलिम्पिकमध्ये सुध्दा होईल, असेही त्यांनी सांगितले. तर सुरक्षेचे सर्व नियम पालन करुन हा उत्सव होणार असून दहीहंडीचा विश्वविक्रम मोडणाऱ्या पथकास २१ लाखांचे बक्षिस देण्यात येणार आहे. या दहिहंडी उत्सवात येणाऱ्या प्रत्येक पथकाला वेगवेगळे थर लावतील तसे बक्षिस दिले जाईल. यंदा राज्य सरकारने उत्सव निर्बंधमुक्त केले असल्याने राज्यातील सर्व छोट्या मोठ्या उत्सव आयोजकानी जास्तीत जास्त प्रमाणात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून बाक्षिसे जाहीर करावीत. जेणेकरून अधिकाधिक गोविंदा पथके यात सहभागी होतील. त्यामुळे दहीहंडी पथकाना रोख बक्षिसे देऊन प्रोत्साहित करणे गरजेचे आहे, असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.
'ठाकरे कुटुंबियांवर टीका करणार नाही' : शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे दौऱ्यांदरम्यान शिंदे गटाच्या आमदारांवर टिका करीत असून याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता, ठाकरे कुटूंबियांविषयी आज आणि भविष्यात कधीही भाष्य करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - Complaint Filed Against CM : औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री शिंदेंविरोधात पोलिसांत तक्रार; 'हे' आहे कारण