ठाणे - शेजारी राहणाऱ्या एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे विवाहीत आरोपीने अपहरण केले. यांनतर त्याने वाराणसीला नेऊन लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केले. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास जिवेमारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास अधिकाऱ्यांनी सुरू केला. अखेर मोबाईल लोकेशनवरून आरोपी वाराणसीत असल्याचे समजले. यानंतर त्याला वाराणसीत अटक करण्यात आली. तसेच आरोपीच्या तावडीतून पीडितेची सुटका केली आहे. राजा असे संबंधित आरोपीचे नाव आहे.
अंबरनाथ पूर्व मधील 15 वर्षाची अल्पवयीन मुलगी कुटूंबासह राहते. याच परिसरात आरोपी राजा देखील राहत असल्याने त्याने पीडितेशी ओळख निर्माण केली. संबंधित आरोपी विवाहीत असून पीडितेशी जवळीक साधून तिला फिरवून आणण्याचे आमिष दाखवले. आरोपीने पीडितेचे अपहरण करून तिला वाराणसीतील खालीसपूर परिसरात एका भाडयाच्या खोलीत वास्तव्याला नेले. याठिकाणी पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तसेच याबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे.
अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पीडितेच्या नातेवाईकांनी दाखल केली होती. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बग्गा यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.भोयर, पो.कॉ.पवार, वाघमारे यांनी आरोपीला अटक केली. वाराणसीतून आरोपीला ताब्यात घेऊन त्यांनी मुलीला पालकांच्या स्वाधीन केले आहे. आरोपी राजा याच्याविरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपहरण, अत्याचार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.