ठाणे - 'डेटॉल'मुळे गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादी ठाणे जिल्ह्यातील सर्वच निवडणुकांमधून साफ झाली आहे. त्यामुळे साहेबांना बोलत होतो, नका ठेवू त्याच्यावर विश्वास अशी खरमरीत टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईकांवर करत त्यांना 'डेटॉल'ची उपमा देत खिल्ली उडवली. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा नागरी सत्कार कार्यक्रम भिवंडीतील महापोली येथे रविवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आव्हाड यांनी भाजपवाशी झालेल्या गणेश नाईकांचे नाव घेऊन त्यांचासह राष्ट्रवादी सोडून गेलेले खासदार कपिल पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा देखील चांगलाच समाचार घेतला.
आव्हाड पुढे म्हणाले, की मागील पाच वर्षात राष्ट्रवादी पक्ष जर कुणी बुडविला असेल तर त्याचे नाव गणेश नाईक आहे. राष्ट्रवादीने नाईकांच्या घरात महापौर, आमदार, खासदार, मंत्री पद दिले. मात्र, त्यांनी काय केले तर पक्ष साफ केला. आता गेले तिकडे मंत्रिपद मिळविण्यासाठी तर राष्ट्रवादी सोडून गेलेले भाजपचे सध्याचे भिवंडी लोकसभा खासदार कपिल पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्यावर देखील त्यांनी टीका केली. कपिल पाटलांना पण राष्ट्रवादीने भरभरून दिले. मात्र, त्यांनी काय केले तर खाडी किनाऱ्याने मातीची भरणी करून बेकायदा गोदामे उभारली. त्यामधून पैसा कमावला. आता त्या पैशाच्या बळावर आमच्या कार्यकर्त्यांशी दादागिरी करतात. असे बोलून त्यांनी खासदार कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. शेवटी भाषणात आव्हाडांनी सध्या केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याला आमचा विरोध असून हा विरोध कायम राहील. मात्र 2010 च्या एनपीआर कायद्याला आमचे समर्थन राहील, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आमदार दौलत दरोडा, ठाणे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, भिवंडी शहर अध्यक्ष भगवान टावरे, महिला अध्यक्षा स्वाती कांबळे, तालुकाध्यक्ष गणेश गुळवी यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.