ठाणे - दिवा रेल्वे फाटकात लोकलच्या धडकेत 2 ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. दिवा रेल्वे स्थानकात खोपोली लोकल पास होत असताना फाटकातून जाणाऱ्या तिघांना लोकलने उडवले. यामध्ये दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला.
मृतामध्ये दीपक शशिकांत सावंत (वय 26), गीता दिलीप शिंदे (वय 35) हे जागीच ठार झाले असून, महादेवी अमोल जाधव (वय 25) या गंभीर जखमी झाल्या आहेत. या दोघांचे मृतदेह शिवाजी हॉस्पिटल कळवा याठिकाणी पाठवण्यात आले असून, पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे, दिवा रेल्वे स्टेशनवरील मुंबई दिशेकडे असलेला अरुंद जिना असल्याने प्रवासी फटकातून जातात, त्यामुळे असे अपघात होतात, व मुंबई दिशेकडे अस्कलेटर लावल्यास प्रवाशी ब्रीजचा वापर करतील, असे संघर्ष कोकण रेल्वे प्रवाशी संघटनेने सांगितले आहे.
दिवा स्थानकाचा मेकओव्हर झाला असला तरी काही अंतर्गत सुविधांकडे रेल्वे प्रशासन अजूनही कानाडोळा करत आहे. दिवा पूर्वेला मुंबई दिशेकडे उतरणारा जिना अरुंद असल्यामुळे तिथे होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रवासी रेल्वे रूळ ओलांडण्याला पसंती देतात. त्यामुळेच दिवा स्थानकात सुरू असलेली अपघातांची मालिका थांबत नाही. बुधवारी सकाळी तीन प्रवाशांना रेल्वेची धडक लागल्याने दोन प्रवाशांना जागीच प्राण गमवावे लागले.
दिवा शहराची ९० टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या ही पूर्वेला असून रेल्वेचे एकमेव तिकीट घर मात्र पश्चिमेला आहे. त्यामुळे बहुतेक प्रवासी तिकिट काढण्यासाठी सर्रास रेल्वेरूळ ओलांडताना दिसतात. दिव्यातील प्रवाशांतर्फे व प्रवासी संघटनेतर्फे सातत्याने मागणी केली जाते की, मुंबई दिशेकडील दिवा पूर्वला उतरणारा जिना रुंद करावा अथवा तेथे सरकता जिना बसवावा जेणेकरून प्रवासी पादचारी पुलाचा वापर करतील. परंतु याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करताना दिसते आणि त्यामुळेच वारंवार येथे अपघात होतात. मध्य रेल्वे प्रशासनातर्फे नुकतंच रेल्वे रुळ ओलांडताना मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांवर भारतीय दंड संहिता कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खरंतर दिव्यासारख्या अन्य ठिकाणी रेल्वे प्रशासनातर्फे पर्याप्त सुविधा उपलब्ध करून न दिल्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव रेल्वेरूळ लागत आहे, अशा ठिकाणी प्रवाशांच्या अपघातासाठी मध्य रेल्वे प्रशासनावर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी प्रवाशांची मागणी आहे. दिवा स्थानकात जर रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पर्याप्त व्यवस्था केली नाही तर भविष्यात दिवा स्थानकात केव्हाही प्रवाशांचा उद्रेक होऊ शकतो याची दक्षता रेल्वे प्रशासनाने घ्यावी, असा इशारा यावेळी दिवा रेल्वे प्रवाशी संघटनेने दिला आहे.