ठाणे - लोकांच्या मनातील भुताची भीती घालवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे शाखेच्या वतीने दरवर्षी स्मशान सहलीचे आयोजन केले जाते. 'चला भुताला भेटायला' या सहली अंतर्गत भूताची भेट घ्यायला ठाणेकर तरुणांसह लहान मुले आणि महिलांनीही गर्दी केली होती.
हेही वाचा... VIDEO: क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा, तलवारीने सपासप वार
अमावस्येची रात्र, सर्वत्र अंधार, स्मशानभूमीत पेटणारी चिता आणि त्या चितेभोवती भुताची प्रतीक्षा करणारे तरुण. पहाटेपर्यंत भूताची वाट पाहिली, परंतु भूत आलेच नाहीत. पहाट होईपर्यंत चितेची आग विझली पण भूतोबा काही आले नाहीत. यामुळे भुताची भीतीही निघून गेली आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आणखी एक प्रयोग यशस्वी झाला.
हेही वाचा... जयपूर साहित्य संमेलनात शशी थरूर यांची चौफेर फटकेबाजी; आरएसएसलाही केले लक्ष्य
भुताची भीती का वाटते ? भूत भेटल्याच्या, झपाटल्याच्या कथा कशा पसरवतात ? अशा अनेक शंकांचे निरसन यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्हा समन्वयक वंदना शिंदे ,या दरवर्षी पुढाकार घेऊन 'चला भूताला भेटायला' या सहलीचे आयोजन करतात. कुठेही भूत नसते, भुताचा फक्त भास होत असतो. काही वेळेला इतरांचे लक्ष्य आपल्याकडे केंद्रित करून घेण्यासाठी भूत झपाटल्याचा देखावा निर्माण केला जातो. तर कधी कधी मानसिक आजारामुळेही संतुलन बिघडते तेव्हा भुताने झपाटले आहे, असे बोलले जाते. अशा वेळी बुवा-बाबांकडे न जाता वैद्यकीय उपचार केले जावेत, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
हेही वाचा... मी असा किती दिवस मार खाऊ? वृद्धेच्या प्रश्नाने जयंत पाटील भावूक
ठाण्याच्या कोलशेत भागातील तरीचा पाडा स्मशानभूमीत या सहलीचे आयोजन केले गेले होते. या सहलीत तीन वर्षाच्या मुलांपासून ते ८५ वर्षाच्या वृद्धांपर्यंत सर्व लोक सहभागी झाले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे यांनी यावेळेस भोंदू बाबांची हात चलाखी कशी ओळखायची, त्यापासून स्वत:चे आणि इतरांचे कसे सरंक्षण करायचे, याचे प्रशिक्षण दिले.